अलिबाग : मासेमारी हंगाम सुरु झाला असला तरी अद्याप अपेक्षीत प्रमाणात समुद्रात मासे मिळत नसल्याची तक्रार मच्छिमार बांधवांकडून करण्यात येत असून त्याच बरोबर जाळ्यात जी काही मच्छी येत त्या सोबत जेलीफीश मोठ्या प्रमाणात येत असल्याने मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. समुद्रात वादळी वारे वाहू लागल्याने मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान रविवारी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळीही समुद्रात उतरलेल्या गणेशभक्तांनाही जेलीफिश दंश झाल्याचे समोर आल्याने, विसर्जनासाठी जाणार्यांना गणेशभक्क्तांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सर्वसाधारणपणे पावसाळ्यात ब्ल्यू बॉटल जेलीफिश किनार्यावर येतात. खोल समुद्रातील वातावरणाच्या बदलामुळे हे जेलीफिश समुद्रकिनारी येतात. दरम्यान जेलीफीश आले म्हणजे मासे कमी मिळणार अशा मच्छिमारांचा वर्षानूवर्षाचा ठोकताळा असल्याचे जेष्ठ मच्छिमार जाया सांरंग यांनी सांगीतले. दरम्यान आता पाऊस ओसरण्याच्या मार्गावर असताना पून्हा जेलीफीश आल्याने सागरी वातावरण अद्याप नियमित झाले नसल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी पूढे सांगीतले.