गणपतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यांतील सुमारे दोन हजार गणेशमूर्ती निर्मीती कार्यशाळांमधून गतवर्षी सुमारे सव्वा लाख गणेशमूर्ती निर्यात झाल्या होत्या त्यामध्ये यंदा 75 हजाराने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यंदा 15 लाख गणेशमुर्तींची निर्मिती झाली असून, 2 लाख गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. यंदाचा पेणच्या गणेशमूर्तींना जीआय (जिऑग्राफीकल इंडेक्स) मांनांकन आणि गणेशमूर्ती निर्मीती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला असल्याने यंदा परदेशात निर्यात होणार्या गणेशमूर्तींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक गुरुसंतप्पा हरळय्या यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
पेण येथील गणेशमूर्ती निर्मीती व्यवसायातील तीसर्या पिढीचे जेष्ठ मुर्तीकार आणि पेण गणेशमूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी दिलेल्या माहिती नुसार इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, थायलंड, जर्मनी,न्युझिलंड, जपान या देशांमध्ये गणेशमूर्ती पाठविल्या जात होत्याच परंतू आता युएई आणि सिंगापूर मध्ये हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने येथेही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागल्याने या देशांमध्ये गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. दरम्यान जीआय नामांकनामुळे आता पेणच्या गणेशमूर्तीची माहिती आता जगभरात कुठेही उपलब्ध होऊ लागली असल्याने पेणच्या गणेशमूर्तींच्या मागणीत आगामी काळात वाढ होईल, असा विश्वास देवधर यांनी व्यक्त केला आहे. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणरायांचे आगमन होत असून गेल्या तिन महिनाभरापासून तालुक्यातील गणेशमूर्ती संपूर्ण महाराष्ट्रासह देशात व परदेशात पाठवायला यंदा सुरुवात झाली. तालुक्याच्या विविध भागात 2 हजारच्या आसपास असलेल्या गणपतीमुर्ती कारखान्यातून 15 लाख गणेशमुर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये शाडू माती आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा समावेश आहे. गणेशमुर्ती निर्मीती व्यवसायात तालुक्यातील 15 ते 18 हजार कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या कामगार रात्रंदिवस काम करुन मूर्तिवर अतिंम हात फिरवण्याचे काम करीत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.
पेणच्या गणेश मूर्ती व्यवसायाला शासनाचा उद्योगांचा दर्जा मिळाल्यामुळे बँकाकडून होणारा पतपुरवठा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. तसेच विदेशात मूर्ती पाठविण्याच्या प्रक्रियाही सुलभ झाली आहे. मुंबई व पुण्यातील व्यावसायिक पेण येथील सुबक गणेशमूर्तीची खरेदी करुन त्या विदेशात पाठविण्याचे काम करतात. पेण शहरातील सुमारे 15 ते 20 कलाकेंद्रांतून परदेशात मूर्ती पाठविण्यात येतात अशी माहिती दिपक कला केन्द्राचे दिपक समेळ यांनी दिली.
ऑस्ट्रेलिया येथील अखिल ऑस्ट्रेलिया मराठी मंडळ ऑस्ट्रेलियातील गणेश भक्तांकरीता गणेशमूर्तीची खरेदी करुन मेलबर्न, सिडनी, पर्ल यांसह इतर भागात श्रींच्या मूर्ती पाठविल्या जातात. त्याचप्रमाणे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे प्रामुख्याने गणेश मूर्ती खरेदी करुन त्या देशातील इतर भागांत तसेच न्युयॉर्कमध्येही पाठविण्यात येतात असे समेळ यांनी सांगीतले.