उरण ः ऐन गणेशोत्सवात बनावट नोटा मोठ्या प्रमाणात वठविल्या जात आहेत. विशेष म्हणजे, गणेशोत्सवात जागरण करताना सुरू असलेल्या पत्त्याच्या खेळात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर केला जात असल्याचे समजते. दहा हजारांच्या ख़र्या नोटा दिल्यानंतर 1 लाख बनावट नोटा मिळत असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे. याला वेळीच आळा घातला नाही तर लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात येऊन व्यापारी व सर्वसामान्य जनतेची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामील असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
बनावट नोट सामान्य माणसाला लगेच ओळखू येत नाही. बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना तुमची ही नोट बनावट आहे, असे अधिकारी सांगतात. त्या नोटेवर लाल रंगाच्या पेनने फुली मारून संबंधिताचे नाव, पत्ता घेऊन बनावट नोट जमा करण्याचे काम बँकेचे अधिकारी करतात. राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी तर अशी नोट फाडूनच टाकतात. ग्राहकाने नोट परत मागितली, तरी दिली जात नाही. त्याचा आर्थिक तोटा होत असतानाच अधिकारी अरेरावीच्या भाषेत ‘पंचनामा करून फिर्याद देऊ का’, असा दम देतात. त्यामुळे सामान्य माणूस निमूटपणे हा प्रकार सहन करतो.
बनावट नोटांमध्ये पाचशे, शंभर अशा नोटांचा समावेश आहे. सणासुदीच्या दिवसामध्ये उरणमध्ये बनावट नोटा बाजारात आणणारी टोळी फिरते, असा संशय व्यक्त होत आहे. पोलीस यंत्रणेकडे या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पोलिसांनी व्यापा़र्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी बनावट नोटा बाजारात आणणा़र्या टोळीचा तपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बनावट नोटांना आळा घातला नाही, तर गुन्हेगारांचे चांगले फावून निरपराध लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे.