

रायगड : यंदाची दिवाळी ही सर्वसामान्यांसाठी महागाईचा फटका देणारी ठरत असल्याचे बोलले जात आहे. किराण्याचा खर्च असो की गोड धोड पदार्थ याचे दर यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहेत. यातच फटाक्याचे दर सुद्धा 30 टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे किराण्याचा अर्धा खर्च फटाक्यावरच होणार आहे, असे दिसून येते. 30 टक्के महागाई असली तरी फटाक्यांचे बार मात्र उडणारच असे दिसून येत आहे.
चार दिवसांपुर्वी फटाके विक्रीची दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी जवळपास 35 दुकाने कार्यरत आहेत. दिवाळीपुर्वी आठ ते पंधरा दिवस आधी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या दुकानांना फटाके विक्रीची परवानगी दिली जाते. त्यानुसार फटाके विक्रीच्या दुकानांमध्ये विविध फटाके विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
बच्चे कंपनीमध्ये फॅन्सी फटाक्यांचे आकर्षण असते. यात वेगवेगळ्या प्रकारांमध्ये फॅन्सी फटाक्यांचे दर वाढले आहेत. दोनशे रुपयांचे फॅन्सी फटाके आता 280 ला मिळत आहे.
तामिळनाडूमधील शिवकाशी या ठिकाणी फटाके तयार होतात. येथे फटाके तयार करण्याचे मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत. देशभरात याच ठिकाणाहून साठा विक्रीसाठी पाठविला जातो.
शहरात फटाक्यांची जवळपास 35 हून दुकाने आहेत. या दुकानांमध्ये दिवाळीपर्यंत होणाचा खरेदी विक्रीच्या व्यवहा रातून जवळपास पाच कोटींची उलाढाल होऊ शकते, असा अंदाज काही व्यापायांनी व्यक्त केला. त्यामुळे सध्या ग्राहक नसले तरी आगामी काळात ग्राहकांवरच ही उलाढाल अवलंबून आहे.
अलिबागमधील रुपाली पडियार यांनी सांगितले की, अजून म्हणावी तशी विक्री झाली नाही. यंदा किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकसुद्धा चौकशी करीत आहेत. दिवाळीच्या एक दोन दिवस आधी खरेदीसाठी गर्दी वाढेल, असे दिसून येते.
यंदा फटाके खरेदी करण्यासाठी काही ठिकाणी चौकशी केली. मात्र दरवाढ झाल्याने या फटाक्यांची खरेदी करताना हात आखडता घेण्याची वेळ येत असल्याचे दिसून येते.
- आदित्य पाटील, नागरिक
हजार-दीड हजार रुपयात सुद्धा आता फटाके पाहिजे तसे मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे फटाक्यांची खरेदी करताना सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे.
- दीपक गोंधळी, नागरिक
दुकाने थाटून चार ते पाच दिवस झाले आहेत. मात्र अजून म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद नाही. दिवाळी सुरू होण्यास अजून चार दिवस आहेत. मात्र ग्राहकांची प्रतीक्षा लागली आहे, असे केदार मगर यांनी सांगितले.