

अलिबाग ः रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणार्या अलिबाग - वडखळ या रखडलेल्या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मंत्रालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी पावसाळ्यानंतर या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे जाहीर केलेले आहे.यामुळे अलिबागच्या विकासाला चालना मिळणार आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत माजी आम.पंडित पाटील यांनी सातत्याने आवाज उठवून राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.
मंत्रालयात विधानसभाध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले,अलिबागचे आम.महेंद्र दळवी, महेश बालदी यांच्यासह माजी आ.पंडित पाटील हे उपस्थित होते.यावेळी पंडित पाटील यांनी अलिबाग -वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अलिबाग ही रायगडची राजधानी असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये अलिबागमध्ये कार्यरत आहेत.
जिल्हा रुग्णालयही अलिबागमध्ये असल्याने या शहराला दर्जेदार रस्त्यांचे जाळे असणे गरजेचे असल्याचे सुचित केले.यासाठी अलिबाग -वडखळ या रखडलेल्या मार्गाचे चौपदरीकरण केले जावे,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.अन्य उपस्थितांनीही रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.
बैठकीतील उपस्थितांच्या भावना लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी अलिबाग -वडखळ या रस्ताच्या चौपदरीकरणाचे काम पावसाळा संपल्यावर तातडीने सुरु करण्याचे आश्वासित केले.तसेच हा मार्ग सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, आता तो मार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.मात्र,हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे कारण देत दोन्ही यंत्रणा या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत असल्याचे या बैठकीत निदर्शनास आणले.यावर मंत्री भोसले यांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा आणि चौपदरीकरणासाठी फेरप्रस्ताव सादर करा असे निर्देश ष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिल्याने या रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे.
महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहे. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणालाही मंजुरी मिळावी, यासाठी येत्या शनिवारी दिल्लीत जाऊन आम्ही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत,अशी माहिती आ. महेंद्र दळवी यांनी दिली आहे.
अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणसाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तर पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी 28 लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.सध्या या मार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे असल्याने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय,शिवाय अनेक लहान,मोठे अपघातही होत आहेत.
रायगड जिल्हातील अलिबाग हे जिल्ह्याच मुख्यालय असून हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. तसेच येथे औंद्योगीकरणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. अलिबाग हे महाराष्ट्रातील एकमेव जिल्ह्याच मुख्यालय आहे की जे चौपदरी मार्गाने जोडले नाही, हा रस्ता चौपदरी होणे अत्यंत अत्यावश्यक आहे.तरी रस्त्याची आवश्यकता लक्ष्यात घेऊन त्या कामास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन दिला जावा.
पंडित पाटील, माजी आमदार