पनवेल : विक्रम बाबर
चांगल्या परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून नाव्हाशेवा येथील एका रहिवाशाना दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पनवेल सायबर सेलच्या पोलीस पथकाला यश आले आहे. सायबर सेलच्या पथकाने या फसवणुकी प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ मोबाईल कार्ड, मोबाईल, सिमकार्ड तसेच आधारकार्ड जप्त केले आहे.
योगेश जैन आणि हिमांशू सेन असे पकडलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे दोघे मित्र अन्य काही मित्रांच्या मदतीने संगनमत करून ऑनलाईन फसवणूक करुन लाखो रुपये कमवायचे, मात्र हे दोघे आरोपी सध्या पनवेल सायबर सेलच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींनी नवी मुबई मधील नाव्हाशेव्हा येथे राहणाऱ्या एका रहिवाशाला दहा लाखाचा गंडा घातला होता. त्या प्रकरणी त्या रहिवाशाने नाव्हाशेवा पोलीस स्टेशन गाठून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी पनवेल सायबर सेलने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
फिर्यादी हे नाव्हाशेव्हा येथे राहणारे आहे. या फिर्यादीला सोशल मीडिया TINDER अँप वरून Emily नावाच्या महिलेने फिर्यादींना संपर्क करून चांगल्या परताव्याच्या गुंतवणुकीची माहिती देऊन, गुंतवणूक करण्यास भाग पाडले. नफ्याचे आमिष बघून फिर्यादी यांनी Emily या महिलेने सांगितलेल्या www.flowertra.com या वेबसाईटवरून त्याचे बँक खाते उघडून घेतले. दहा लाख चाळीस हजार चारशे बारा रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात टाकून गुंतवणूक करण्यास सांगितले, Emily या महिलेने सांगितलेल्या बँकेत पैसे देऊन फिर्यादी यांनी गुंतवणूक देखील केली. गुंतवणूक केल्यानंतर नफा कधी मिळणार या साठी फिर्यादी हे फोनच्या माध्यमातून माहिती घेत हेते, मात्र काही दिवसानंतर फोन घेणे बंद झाले. यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांना समजले.
या नंतर फिर्यादीने नाव्हाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास पनवेल सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या पथकाने सुरू केला, तपास सुरू केल्यानंतर ज्या खात्यात पैशे भरण्यात आले आहेत, त्या बँकेतून खात्याची माहिती घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला. हे बँक खाते वसई विरार परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वसई विरार मध्ये अशे बनावट बँक खाते बनवणारी टोळी असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहिती नुसार वरिष्ठ पोलीस नोरीक्षक दीपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस हवालदार प्रगती म्हात्रे, पोलीस शिपाई अतुल मोहिते, विकी भोगम तसेच अन्य पोलिस कर्मचारी यांनी वसई विरार येथील बँक खात्याच्या पत्यावर धाड मारली.
त्या पत्यावरील शॉपमध्ये पोलिसांना ०९ मुले मिळून आली. त्यामध्ये नाव बदलेले दोन आरोपी योगेश जैन आणि हिमांशू सेन पोलिसांना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हे दोघे अन्य साथीदारांच्या मदतीने उत्तरप्रदेश तसेच राजस्थान मधील गावातील युवकांना नोकरीचे अमिष दाखवून या ठिकाणी बोलवायचे आणि त्यांच्या नावावर वेगवेगळ्या खात्यात बँक खाते खोलायाचे आणि बँकेचे डेबिट क्रेडिट कार्ड घ्यायचे, हे बँक खाते उघडण्यासाठी एकाच शॉप वर वेगवेगळे बनावट करारपत्र बनवून तसेच बनावट पोलीस व्हेरिफिकेशन बनवत असल्याचे समोर आले आहे.
बँक खाते खोलल्यानंतर हे पासबुक, डेबिट कार्ड, सिमकार्ड, अन्य काही वस्तू ट्रेन ने उदयपूर आणि राजस्थान येथील साथीदारांना पाठवून द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून फसवुक करून लाखो रुपयांची माया ते कमवत असत. त्या वसई विरार येथील शॉपमधून पोलिसांना 52 वेगवेगळ्या बँकेचे क्रेडिट कार्ड, 18 मोबाईल कार्ड, 17 चेक बुक, 15 सिमकार्ड, 08 आधारकार्ड, 07 पॅनकार्ड, 03 ड्रायव्हिंग लायसन्स, 02 ओटर आयडी कार्ड, बनावट व्हिझिटिग कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत.
52 वेगवेगळ्या बँकेचे क्रेडिट कार्ड, 18 मोबाईल कार्ड, 17 चेक बुक, 15 सिमकार्ड, 08 आधारकार्ड, 07 पॅनकार्ड, 03 ड्रायव्हिंग लायसन्स, 02 ओटर आयडी कार्ड, बनावट व्हिझिटिग कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत.
फसवणुकीचे पैसे आपल्या खात्यात घेण्यासाठी अटक केलेल्या संशयित आरोपींकडून 17 चेक बुक मिळून आले आहेत, हे सर्व चेक बुक वेगवेगळ्या बँकेचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी या संशयित आरोपीने पंधराहून अधिक बँक खाती उघडली आहेत.