राष्ट्रपतींचा रायगड दौरा : संयोगिताराजेंनी घेतला पूर्व तयारीचा आढावा | पुढारी

राष्ट्रपतींचा रायगड दौरा : संयोगिताराजेंनी घेतला पूर्व तयारीचा आढावा

नाते (रायगड); पुढारी वृत्तसेवा

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (राष्ट्रपतींचा रायगड दौरा) ६ डिसेंबर रोजी दुर्गराज रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची पूर्वतयारी जिल्हा प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागांकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. काल मंगळवारी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी सौ. संयोगिता राजे आणि रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रायगडला भेट देवून या पूर्व तयारीची पाहणी केली.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या ( राष्ट्रपतींचा रायगड दौरा ) प्रोटोकॉलनुसार त्यांच्यासाठी गड परिसर आणि गडावर विविध सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम आणि पाणी पुरवठा विभाग, महावितरण, भारतीय पुरातत्व विभाग, आरोग्य विभाग, गृह विभाग यांच्या माध्यमातून आवश्यक ती कामे गड आणि गड परिसरात सुरु आहेत.

याच दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सौ. संयोगिता राजे यांनी गडावर जावून या कामांची पाहणी केली. त्याचप्रमाणे राष्ट्रपती गडावरील ज्या- ज्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. त्या- त्या ठिकाणी कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे त्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

या दौऱ्यामध्ये डॉ. कल्याणकर, सौ. संयोगिता राजे यांच्यासह महाडच्या प्रांताधिकारी सौ. प्रतिमा पुदलवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश तांबे, विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

सुरक्षिततेच्या कारणासाठी रायगड किल्ला पर्यटनांसाठी ३ ते ७ डिसेंबरपर्यंत बंद

रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या आजुबाजूकडील परिसर हे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीच्या पार्श्र्वभूमीवर सुरक्षिततेसाठी दिनांक ३/१२/ २०२१ ते दिनांक ७/१२/ २०२१ रोजी पर्यटनासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रोड व नातेगाव ते पाचाड बाजुकडील रोड सुध्दा सुरक्षिततेच्या कारणासाठी पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहेत. पर्यटकाची गैरसोय होवु नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातून ही माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींच्या दौर्‍यात बदल

आधी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ६ डिसेंबरला घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या गावाला तर ७ डिसेंबर रोजी किल्ले रायगडला भेट देणार होते. मात्र, या कार्यक्रमात बदल झाला असून ६ डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता राष्ट्रपती किल्ले रायगडवर येणार असल्याची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button