भारताचे राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या विनंतीवरून येत्या सात डिसेंबर रोजी हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. या बाबतची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे.
यासंदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपण काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीप्रसंगी किल्ले रायगडावर येण्याची विनंती केली होती. त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या सात डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर येणार आहेत.
यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती कै. झेलसिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यानंतर सुमारे तीन दशकांचा कालावधी नंतर देशाचे महामहिम राष्ट्रपती किल्ल्यावर येत असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.