कशेडी घाटात टँकर पलटी ; चालक ठार ! | पुढारी

कशेडी घाटात टँकर पलटी ; चालक ठार !

पोलादपूर : पुढारी वृत्‍तसेवा

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात टँकर चालकाचा केबिनमध्ये अडकून मृत्‍यू झाला. आज (दि २२) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कशेडी गाव हद्दीत घडली.

टँकर चालक वशिम (पूर्ण नाव माहीत नाही) हा आपला ताब्यातील टँकर ( एम एच ०४ जे के ७७१७ ) घेऊन वापी ते लोटे खेड जात होता. घाट उतरत असताना एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून टँकर पलटी झाला.या अपघातामध्ये टँकर चालक वशिम हा केबिन मध्ये अडकून दबून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या टँकर मध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड हे केमिकल असून ते ज्वलनशील नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. केमिकल ज्वलनशील नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेची माहिती समजताच कशेडी महामार्गाचे सहाय्यक पोलीस फौजदार यशवंत बोडकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच खेड पोलीस ठाण्याचे पीएसआय गडदे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी तात्काळ क्रेन पाचारण करून क्रेनच्या साहाय्याने टँकरमध्ये दबून अडकलेल्या चालकास बाहेर काढले. मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेतून मृत चालकास उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे पाठविण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू ठेवली आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ

मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला?

 

 

Back to top button