अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपींच्या मोबाईलची तपासणी | पुढारी

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपींच्या मोबाईलची तपासणी

“पनवेल : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]\

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या सुनावणीत शुक्रवारी मुख्य आरोपीचे जिवलग मित्र आणि सहआरोपी महेश फळणीकर व अभय कुरुंदकर याचा खासगी वाहनचालक कुंदन भंडारी यांच्या मोबाईलच्या तांत्रिक बाबी व कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. ही माहिती पुरावे म्हणून रेकॉर्डवर नोंदवण्यात आली आहे.

आरोपीच्या संदर्भात मोबाईल नेटवर्क व जीपीआरएस संदर्भातील मोबाईल नेटवर्क कंपनीच्या अधिकार्‍यांची उलटतपासणी सुरू झाल्यापासून खळबळजनक खुलासे समोर येऊ लागले आहेत. बिद्रे यांची हत्या झाली त्या दिवशी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासोबत त्याचे मित्र आणि सहआरोपी यांचे मोबाईल नेटवर्क आणि जीपीआरएस हे एकाच ठिकाणचे असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी व्होडाफोनच्या नोडल ऑफिसरची उलटतपासणी घेतली.

या उलटतपासणीत मुख्य आरोपीचा साथीदार मित्र आरोपी राजू पाटील हा देखील अश्विनी बिंद्रेच्या हत्येच्या दिवशी कुरुंदकर यांच्या भाईंदर येथील घरात तब्बल 12 मिनिटे होता, असा खळबळजनक पुरावा व खुलासा समोर आला होता. त्या नंतर शुक्रवारी अश्विनी बिंद्रेचा खून कसा झाला हे तपासात उलगडा करणार्‍या बाबीची तपासणी झाली

पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला आयडियाचे नोडल ऑफिसर शिंदे यांची उलटतपासणी होणार होती. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने ते साक्षीला येऊ शकले नाहीत. मात्र 2018 पासून व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आले असल्याने सध्या नोडल ऑफिसर चांगदेव गोडसे यांना कागदोपत्री आणि तांत्रिक बाबतीत साक्ष घेऊया का, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टासमोर ही बाब उपस्थित केली. त्याला आरोपीच्या वकिलांनी मान्यता दिली.

मात्र शिंदे यांना काही महत्त्वाच्या बाबींसाठी यावे लागेल, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टासमोर सांगितले. या केसची पुढील सुनावणी 25 आणि 26 नोव्हेंबर सलग दोन दिवस होणार आहे. यावेळी न्यायालयात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, राजू गोरे, एसीपी संगीता शिदे-अल्फान्सो उपस्थित होते.

Back to top button