प्रलंबित मागण्यांसाठी महाड एसटी आगारामध्‍ये पहाटेपासून बंद आंदाेलन | पुढारी

प्रलंबित मागण्यांसाठी महाड एसटी आगारामध्‍ये पहाटेपासून बंद आंदाेलन

महाड ; पुढारी वृत्‍तसेवा :

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या, थकबाकी, पगारवाढ व महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण संदर्भात विभागीय कर्मचाऱ्यांकडून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज (दि. २८ ) पहाटेपासून महाड आगारातील सर्व कामगार संघटनांनी शंभर टक्के पाठिंबा दिला. पहाटेपासून एकही बस आगाराबाहेर सोडण्यात आली नसल्याची माहिती कामगारांकडून देण्यात आली.

या आंदोलनासंदर्भात माहिती देताना उपस्थित कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की, शासनाकडून मागील झालेल्या करारानंतरची थकबाकी अजून प्राप्त झाली नसून, यंदा वर्षीच्या दिवाळी बोनस बाबतही मागणी दुर्लक्षित आहे. गेल्या काही वर्षांतील महामंडळावर आलेल्या अडचणी लक्षात घेता कामगार संघटनांकडून महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे. या सर्व मागण्यांकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात एसटी महामंडळाच्या विभागीय कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून आझाद मैदानात सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोचे कामकाज आज बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

कामगार संघटनांनी घेतलेल्या या बंदचे दृश्य परिणाम संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहेत. दिवसभरात आज एसटी आगारातून कोणतीही गाडी जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. दरम्यान या आंदोलनासंदर्भात शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून हाेत आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button