रायगड : नातेखिंडीपासून राज दरबारापर्यंत राज्याभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात! | पुढारी

रायगड : नातेखिंडीपासून राज दरबारापर्यंत राज्याभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात!

नाते; पुढारी वृत्तसेवा : येत्या दोन जून रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जेष्ठ शुद्ध त्रयोदशी  या दिवशी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी नातेखिंडपासून राज दरबारापर्यंत अंतिम टप्प्यात आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तळोशी परिसर, नातेखिंड परिसर या मार्गावरती असलेले खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याचे दिसून आले आहे.

किल्ले रायगडावर जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ या ठिकाणी देखील आकर्षक पद्धतीने रायगडाच्या तत्कालीन वास्तूचे देखावे तयार करण्याबाबतची कामे प्रगतीपथावर आहेत. दोन जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी तिथीनुसार संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यासंदर्भात नातेखिंड येथे भव्य कमानी उभारण्याचे काम सुरू आहे. राज दरबारामध्ये देखील साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या असलेल्या दरबाराची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक राज्याभिषेक दिन उत्सव समिती कोकणकडा मित्रमंडळाचे प्रमुख नितीन पावले व शिवसेना महाड संपर्कप्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे यांच्याकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

आज (दि. २९) दुपारी नितीन पावले सुरेश पवार बंधू तरडे यांच्यासमवेत किल्ले रायगडावर प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली असता रायगडाच्या पायरी मार्गाठिकाणी तसेच किल्ले रायगडावर विविध ठिकाणी संदीप वेंगुर्लेकर या कलावंतांकडून ऐतिहासिक पद्धतीचे देखावे व बांधकाम केले जात असल्याचे निदर्शनास आले.

साडेतीनशे वर्षांपूर्वीची तत्कालीन दरबाराची आठवण

किल्ले रायगडावरील नगारखान्यापासून राज सिंहासनापर्यंतच्या जागेमध्ये भव्य प्रमाणात सुरू असलेले काम हे साडेतीनशे वर्षांपूर्वीची तत्कालीन दरबाराची आठवण करून देणारे असेल, असे मत या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना संदीप वेंगुर्लेकर यांच्याशी झालेल्या अनोपचारिक चर्चेमधून प्राप्त झाली.

गेल्या एक महिन्यापासून किल्ले रायगड व परिसरातील शासनामार्फत होत असलेल्या कामांची पाहणी प्रत्येकी दोन दिवसाआड जिल्हा प्रशासनामार्फत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने केली जात आहे. विविध विभागांच्या कामांची पूर्तता जवळपास पूर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसानंतर होणारा 350 वा राज्याभिषेक सोहळा साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या सोहळ्याची आठवण करून देणारा ठरेल असा विश्वास या ठिकाणी येणाऱ्या तमाम शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे.

लाखो शिवभक्तांच्या सोयी सुविधांची तयारी

स्थानिक प्रशासनामार्फत तसेच पोलीस प्रशासनामार्फत येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सोयी सुविधांची तयारी सुरु असल्याचे माहिती महाडच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. दरम्यान नातेखिंड ते पाचाड पर्यंत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे खड्डे पडल्याच्या जागी हे खड्डे भरून काढण्याचे काम युद्ध पातळीवर खड्डे भरण्याची कामे सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Back to top button