Mohan Bhagwat : किल्ले हे आपली स्फूर्ती स्थाने- सरसंघचालक मोहन भागवत  | पुढारी

Mohan Bhagwat : किल्ले हे आपली स्फूर्ती स्थाने- सरसंघचालक मोहन भागवत 

महाड, पुढारी वृत्तसेवा : किल्ले ही आपली स्फूर्ती स्थान असून त्यांचे जतन व संवर्धन करणे ही आपली कर्तव्य पुरती असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मालवण येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले. (Mohan Bhagwat)

अखिल भारतीय गिर्यारोहण महासंघाच्या  “टू द स्केल “या उपक्रमांतर्गत विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची मोहीम सध्या सुरू आहे, या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते विजयदुर्ग व सिंधुदुर्ग या किल्ल्याचे प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिवभक्त व ग्रामस्थांसमोर सरसंघचालक मोहन भागवत आपले विचार व्यक्त करीत होते. ते पुढे म्हणाले की किल्ले पाहणे व जाणून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून हे सर्व प्रेरणादायी आहे. अखिल भारतीय गिर्यारोहण महासंघाने सुरू केलेले काम प्रशंसनीय असून अभिमानास्पद आहे.

सांगली येथील रमेश बलुरंगी यांच्या हस्ते या प्रतिकृती स्थापत्यशास्त्रातील मानांकरानुसार उभ्या बनविण्यात आल्या आहेत. सध्या किल्ल्याची झालेली पडझड लक्षात घेता शास्त्रीय पद्धतीने विचार करून हे किल्ले तत्कालीन काळामध्ये कसे असतील त्यानुसार त्यांच्या प्रतिकृती निर्माण करण्यात आल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली. या कार्यक्रमाला महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव, सचिव डॉक्टर राहुल वारंगे यांच्यासह सिंधुदुर्ग येथील गिर्यारोहण संस्थांचे प्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाडमध्ये प्रदर्शनासाठी उपलब्ध असणार

या दोन्ही किल्ल्यांच्या प्रतिकृती पुढील आठ दिवसांकरिता महाड येथील जनकल्याण रक्त केंद्रामध्ये नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्यासाठी प्रदर्शनात उपलब्ध राहणार आहेत. अशी माहिती डॉक्टर राहुल वारंगे यांनी दिली आहे.  महाड मधील विविध सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांना आपल्या विद्यार्थी व कार्यकर्त्यांकरता प्रेरणादायी ठरणाऱ्या या वास्तू पाहण्यासाठी नियोजन करावे असे सूचना केली आहे.

हेही वाचा

Back to top button