सिंधुदुर्ग : कुडाळ एसटी आगाराच्या बसला अपघात! चालकासह ७ ते ८ प्रवाशी जखमी | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळ एसटी आगाराच्या बसला अपघात! चालकासह ७ ते ८ प्रवाशी जखमी

कुडाळ (सिंधुदुर्ग), पुढारी वृत्तसेवा : कुडाळ एसटी आगाराच्या भोगवे येथून कुडाळला येणाऱ्या एसटी बसला वालावल श्री. भावई मंदीर नजिकच्या उतारावर गुरूवारी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास अपघात झाला. उतारावर बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. तरीही चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र बस झाडाला धडकली. यावेळी बसमधील प्रवाशी घाबरले. या अपघातात चालकासह सात ते आठ प्रवाशांना दुखापत आहे. त्यांच्यावर वालावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सुदैवाने मोठा अपघात टळला.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, कुडाळ आगाराची ही बस भोगवे येथून कुडाळला प्रवाशांना घेऊन येत होती. वालावल येथे ही बस आल्यावर तेथील उतारावर बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस लगतच्या घळणीला जोरात धडकली. दरम्यान ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत चालकाच्या बाजूने बसवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे बस दुसऱ्या बाजूला सुमारे 15 ते 20 फूट खोल खाली सखल भागात कोसळण्यापासून बचावली.

चालकाच्या बाजूने बस घळणीला धडकली. यावेळी बसमधून चालक, वाहकासह पंधरा ते वीस प्रवाशी प्रवास करत होते. बसचा अपघात झाल्‍याने प्रवाशांनी भितीने आरडाओरडा केला. या अपघातात एसटीच्या समाेरील काच फुटून मोठे नुकसान झाले. तसेच चालकासह सात ते आठ प्रवाशांना दुखापत झाली. त्‍यांना तात्‍काळ ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना वालावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

-हेही वाचा

आचरा : प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून भरवले रांगोळी प्रदर्शन

चिंचवडच्या जागेवर आता शिवसेनेचा दावा; महाविकास आघाडीत एकमत होणार की बिघाडी?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : जगताप यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याबाबत दुमत नाही : पालकमंत्री पाटील

Back to top button