माथेरान गाडीची घंटा देतेय १९०७ च्या आठवणींना उजाळा | पुढारी

माथेरान गाडीची घंटा देतेय १९०७ च्या आठवणींना उजाळा

कर्जत; पुढारी वृत्तसेवा :  सर आदमजी पिरभॉय यांनी सन १९०७ साली माथेरान मिनीट्रेन सुरु करून खऱ्या अर्थाने माथेरानचे दळण-वळण चालू करून पर्यटनाला चालना दिली. मिनीट्रेनमुळे माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आले. मिनीट्रेन सुरू झाली त्या काळात उद्घोषणा नसल्याने माथेरान मिनीट्रेनचा सर्व कारभार येथील रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या घंटेवर चालत असे, आजही ही घंटा १९०७ सालची साक्ष देते. त्याकाळी इतर कुठलेही वाहन नसल्याने माथेरानच्या मिनी ट्रेनवर सर्व गणित अवलंबून असायचे.

माथेरानची गाडी वॉटर पॉईप स्टेशन वरून निघाली की ही घंटा वाजवली जात असे त्यामुळे गाडीने वॉटर पॉईप स्टेशन सोडले आता गाडी अर्ध्या तासात माथेरानला पोहोचेल असे संकेत मिळत असत. ही एक गाडी हाच पर्याय असल्याने गाडी माथेरान स्टेशनमध्ये येताच हॉटेल चालक तसेच रेल्वे स्टेशनचे लायसन्स पोर्टर स्टेशनमध्ये जमा होत असायचे. माथेरानहून पहिली गाडी सकाळी ६.४५ वाजता सुटत असल्याने ही घंटा सकाळी पाच वाजता विशिष्ट ठोके वाजवुन इंजिन चालक तसेच गार्ड व गाडीवर असणाऱ्या ब्रेक पोर्टरांना जागे करण्याचे काम करत असत. दुसरी घंटा सकाळी ३.३० वाजताच्या दरम्यान वाजवून गाडीला इंजिन जोडले जाई तर गाडी सुटायच्या पाच मिनिटे अगोदर घंटा वाजवून प्रवाशांना गाडी सुटायची वेळ झाल्याचे सुचित करून जागेवर बसण्याची सुचना असायची.

२००५ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ माथेरान मिनी ट्रेनचे वेळापत्रक कोलमडुन पडले, ते आज पर्यंत रूळावर आलेच नाही. तसेच त्यानंतर बंद झालेल्या घंटेचा आवाज आजपर्यंत कानावर पडला नाही. आता फक्त तिथे घंटा असून त्या घंटेतील वाजवण्याचा आतील दांडा गायब आहे. नवीन आलेल्या बऱ्याच रेल्वे कर्मचाऱ्यांना या घंटेबद्दल माहिती देखील नाही. नेरळहून माथेरान करीता निघालेली गाडी पुर्वी दोन तासात माथेरानला पोहचत असे. परंतु, टेक्नोलॉजी आली आणि गाडीला माथेरान येथे पोहोचायला तीन तास लागु लागले.
पुर्वी संध्याकाळी ५ वा. नेरळहून माथेरानला गाडी मुक्कामाकरीता येत असे. परंतु, २००५ च्या अतिवृष्टीत रेल्वे प्रशासनाकडुन ती गाडी बंद करण्यात आली, ती आजपर्यंत पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही.

Back to top button