रायगड : फ्लेमिंगो झाला भारतीयच पक्षी.. | पुढारी

रायगड : फ्लेमिंगो झाला भारतीयच पक्षी..

अलिबाग; जयंत धुळप :  मुंबई – गुजराथ अंतर १६ ते ३४ तासांत पार केल्याची नोंद सैबेरीयन फ्लेमिंगो पक्षी हे भारतातच स्थायीक होत असल्याचा नवा अभ्यास जीपीएस रेडिओ टॅगींगमधून पुढे आला आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत त्यांनी नवी मुंबई ते कच्छ हा ८०० किमीचा प्रवास या फ्लेमिंगोने केला असून ६ पक्षांच्या लोकेशन ट्रॅकिंगमधून पुढे आला आहे.

फ्लेमिंगो हे पक्षी यापूर्वी ७ हजार किमीचा प्रवास करून दरवर्षी हिवाळ्यात महाराष्ट्रात दाखल होत असत. मात्र अलिकडे १० वर्षात या पक्षांचा प्रवास बदलला आहे. यातील जवळपास ५ हजार पक्षी हे या भागात स्थायिक झाल्याचे चित्र आहे. तर बाकीचे पक्षी हे स्थलांतरीत होते. या भागात येणाऱ्या फ्लेमिंगोची संख्या जवळपास अडीच लाख एवढी आहे. मात्र यातील स्थलांतरीत होणारे पक्षी हे गुजराथ – महाराष्ट्रातच येत असल्याचे पुढे आले आहे.

गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल २०२२ या दरम्यान जीपीएस – जीएसएम रेडिओ टॅग करण्यात आलेले ‘खेंगरजी तिसरा’, ‘लेस्टर’, ‘मॅककॅन’, ‘सलीम’, ‘हुमायूं’, आणि ‘नवी मुंबई’ हे सहा फ्लेमिंगो गेल्यावर्षी १६ ते ३४ तासांचा हवाई प्रवास करुन गुजराथमधील कच्छच्या अभयारण्यात पोहोचल्याची नोंदी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. यंदा कच्छ आणि भावनगर परिसरातील पाणथळीच्या जागांवरील पाणी आणि खाद्य तेथे विपूल प्रमाणात उपलब्ध असल्याने हे सहाही फ्लेमिंगो अद्याप तेथेच मुक्कामी आहेत. त्यांनी अद्याप ठाणे, मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केलेला नाही. ते पूढील दोन महिन्यात येणे अपेक्षीत आहे, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक तथा पक्षी संशोधक डॉ. राहुल खोत यांनी दिली आहेत. दरम्यान अन्य फ्लेमिंगो मात्र दरवर्षी प्रमाणे यंदा पाऊस लांबल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरात दाखल झाले आहेत. दरवर्षी सुमारे तीन लाखाच्या आसपास फ्लेमिंगो येथे येत असल्याचे डॉ. खोत यांनी सांगीतले. भारतामध्ये फ्लेमिंगो पक्षांचे प्रजनन आणि स्थलांतर या बाबत पक्षी संशोधक आणि अभ्यासकामंध्ये मोठे औत्सूक्य आहे.

देशातील प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या ठिकाणी फ्लेमिंगोच्या स्थलांतरणाचे रहस्य शोधण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राज्यात प्रथमच मुंबई येथे सॅटेलाईट टेलिमेट्री अभ्यासाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत सहा फ्लेमिंगोंना सौर उर्जेवर चालणारे ‘जीपीएस- जीएसएम रेडिओ टॅग’ लावण्यात आले आहेत. ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य हे सुमारे अडीच लाख स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे. सप्टेंबर ते मे या कालावधीत सुमारे १.३ लाख फ्लेमिंगो येथे येतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यातील लेसर आणि ग्रेटर फ्लेमिंगोचे स्थलांतर आणि अधिवास वापराचे नमुने समजून घेण्यासाठी सॅटेलाइट टेलिमेट्री अभ्यास सुरू केला आणि त्यांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापन कृती सुचवल्या. जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत उच्च भरतीच्या ठिकाणी सहा फ्लेमिंगो पकडले आणि त्यांना सौर ऊर्जेवर चालणारे ‘जीपीएस – जीएसएम रेडिओ टॅग’ लावले. उपसंचालक डॉ. पी. सथियासेल्वम आणि शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांच्यासह बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या चमूने ही कामगिरी केली.

जीपीएस – जीएसएम रेडिओ टॅग करण्यात आलेल्या या सहा फ्लेमिंगोंना नावे देण्यात आली आहेत. भारतात प्रथम ग्रेटर फ्लेमिंगो प्रजननाचा शोध लावणाऱ्या कच्छचे राव खेंगरजी तिसरा साहिब बहादूर यांच्या नावावरून ‘खेंगरजी तिसरा’ हे नाव, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कच्छच्या पक्ष्यांवर पुस्तके आणि संशोधन लेख प्रकाशित करणारे ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि पक्षीशास्त्रज्ञ कॅप्टन सी. डी. लेस्टर यांच्या नावावरून ‘लेस्टर’, प्रख्यात निसर्गतज्ज्ञ चार्ल्स मॅककॅन यांच्या नावावरून ‘मॅककॅन’, कच्छमध्ये लेसर फ्लेमिंगो प्रजननाची पुष्टी करणारे प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावावरून ‘सलीम’, पक्षीशास्त्रज्ञांपैकी एक हुमायून अब्दुलाली यांच्या नावावर ‘हुमायूँ’, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोचे दरवर्षी आगमन होते म्हणून सहाव्या फ्लेमिंगोला ‘नवी मुंबई’ असे नाव देण्यात आले आहे. ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत आहेत. राज्याच्या वनखात्याने या अभ्यास प्रकल्पाला परवानगी दिली.

Back to top button