पनवेल : गुंगीचे औषध पाजून रिक्षाचालकास लुटले | पुढारी

पनवेल : गुंगीचे औषध पाजून रिक्षाचालकास लुटले

पनवेल; पुढारी वृत्तसेवा :  रिक्षामध्ये बसलेल्या दोघा प्रवाशांनी रिक्षा चालकाला कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध पाजून दोन तोळे वजनाची सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा पाऊण लाख रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. रिक्षा चालक मारुती म्हात्रे (45) हे तीन दिवसांनंतर शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

करंजाडेत राहणारे मारुती म्हात्रे हे उरण नाका रिक्षा स्टँडवर रिक्षा घेऊन उभे होते. यावेळी दोन व्यक्ती पनवेल बस स्टँड येथे जाण्याच्या बहाण्याने रिक्षात बसले.बस स्टँडवर पोहोचल्यानंतर दोघांनी म्हात्रे यांना कळंबोली एमजीएम हॉस्पीटल येथे जाण्याचा बहाणा करुन त्यांना कळंबोलीतील वरुण बार जवळ नेले. त्यानंतर एक व्यक्ती 50 हजार रुपये घेऊन येणार असल्याचे सांगून म्हात्रे यांना थांबवून ठेवले. दुसर्‍या व्यक्तीने कोल्ड्रींक्सच्या तीन बाटल्या आणून त्यापैकी एक बाटली म्हात्रे यांना दिली. म्हात्रे यांनी कोल्डींक प्यायल्यानंतर दोघा व्यक्तींनी त्यांना रोडपालीमध्ये नेले. म्हात्रे यांना गुंगी आल्याने ते रिक्षामध्ये बेशुध्द पडले. याचाच फायदा उचलत दोघा लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, रोख रक्कम लुटली.

Back to top button