संभाजीराजेंनी रायगडवर साजरा केला भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव | पुढारी

संभाजीराजेंनी रायगडवर साजरा केला भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

नाते, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने संभाजीराजे छत्रपती यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी नगारखान्यासमोर राष्ट्रीय ध्वज फडकवत ध्वजारोहण केले. पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांनी राष्ट्रध्वजास सलामी दिली.

छत्रपती संभाजीराजे

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट केली. यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, अगणित वीरांच्या बलिदानातून १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते. तसेच ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडवर सार्वभौम स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला आहे असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीराजे

स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तीमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे, अशी भावना संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केली.

    हेही वाचलंत का?

Back to top button