नारायण राणे यांना जामीन मंजूर; महाड सत्र न्यायालयाचा निर्णय | पुढारी

नारायण राणे यांना जामीन मंजूर; महाड सत्र न्यायालयाचा निर्णय

रत्नागिरी / महाड : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघुउद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल पोलिसांनी कारवाई करीत त्यांना आज (मंगळवार) दुपारी अटक केली. त्यानंतर संगमेश्वर पोलिसांकडून महाड पोलिसांनी ना. राणे यांना ताब्यात घेऊन महाड येथील न्यायालयात हजर केले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शेख भाऊसोा पाटील यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राणे यांची रात्री उशिरा जामिनावर सुटका केली.

राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर सोमवारी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर राणे यांच्यावर महाड, नाशिक, पुणे आदी विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी ना. राणे यांना संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी स्मारक येथे दुपारी अटक करण्यात आली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्यानंतरच शिवसेना व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यावरून वाद सुरू झाला. ना. राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण केले होते. त्यानंतर ना. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा जसजशी पुढे जाऊ लागली, तसतशा राज्यातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. सोमवारी रायगडमधील महाड येथील सभेमध्ये सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात ना. राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी ना. राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले. सुरुवातीला नाशिक, पुणे व महाड येथे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले.

नारायण राणे
संगमेश्वर ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आल्यानंतर त्यांना मोटारीतून नेताना पोलिस.

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

ना. राणे यांना अटक करण्याच्या हालचाली मंगळवारी पहाटेपासूनच सुरू झाल्या. चिपळुणात ना. राणे यांना अटक होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, ना. राणे यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले. चिपळूण येथे जन आशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमादरम्यान देखील शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. मराठा समाजाच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ना. राणे बोलत असताना शिवसेना-भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या समोरच एकमेकांना भिडले. मात्र, ना. राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केल्याने पुढील अनर्थ टळला. या दरम्यान सुमारे पाऊण तास मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता.

खबरदारी म्हणून पोलिसांनी रणनीती आखली

जिल्ह्यात ठिकठिकाणी ना. राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी निदर्शने केली. रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे ना. राणे यांचे स्वागत फलक तोडण्यात आले. चिपळूण येथेही शिवसेना व भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

ना. राणे यांनी चिपळूण येथून रत्नागिरीच्या दिशेने प्रयाण केले. त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे अटक होईल, असे सांगण्यात येत होते. रत्नागिरीमध्ये जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी आदी शिवसेना नेते आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

ना. राणे यांना रत्नागिरी येथे आणल्यास परिस्थिती विस्फोटक बनेल, यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी रणनीती आखली.

अशी झाली अटक

ना. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा चिपळूणहून सावर्डे, आरवलीमार्गे संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांचे गोळवली हे गाव आहे. तेथे त्यांचे स्मृतिस्थळ असून, या स्मृतिस्थळी दर्शनासाठी ना. राणे गेले होते. दर्शन झाल्यानंतर तेथेच ते जेवत होते. त्याचवेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या नंतर त्याठिकाणी वातावरण तणावाचे बनले. भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

रायगडमधील महाड येथील सिद्धेश सुनील पाटेकर (रा. काजळपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महाडमध्ये केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर भा. दं. वि. क. 153/2021 अ (1), (ब), (क) 189, 504, 505 (2), 506 अन्वये महाड शहर पोलिस हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला. त्या संदर्भातील पत्र रायगडमधील सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी नीलेश तांबे यांचे पत्र संगमेश्वर पोलिस निरीक्षक उदय झावरे यांना देण्यात आले. त्यानुसार ना. राणे यांना संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोळवली टप्पा येथे दुपारी ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी रायगड पोलिस पथकातील अपर पोलिस अधीक्षक सचिन जौंजाळ, पोलिस निरीक्षक शैलेश सणस, पोलिस निरीक्षक मिलिंद कोपडे आदींच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त

ना. राणे यांना अटक केल्यानंतर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ नये म्हणून पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत.

चिपळूण, खेड येथे रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी

संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे ना. राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रायगड पोलिस ना. राणे यांना घेऊन रायगडच्या दिशेने रवाना झाले. ना. राणे यांना पाहण्यासाठी सावर्डा, चिपळूण, खेड येथे रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.

सोमवारी महाडमध्ये राणेंची पत्रकार परिषद झाली ती साडेसहा वाजता. देशाचा हीरक महोत्सव की अमृत महोत्सव असे विचारणारा हा मुख्यमंत्री आहे की कोण आहे? असा एकेरी उल्लेख करत ‘मी तेथे असतो तर कानशिलात लगावली असती’, असे वादग्रस्त विधान राणे यांनी केले. या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले. नाशिक, महाड, ठाणे आणि पुणे अशा विविध भागात राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यांसारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर राणेंच्या अटकेची तयारी राज्य सरकारने सुरू केली आणि मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास संगमेश्वरजवळ गोळवली येथे पोलिसांनी त्यांना अटक केली.

अटक टाळण्याची धडपड

मंगळवारी सकाळपासूनच राणे यांच्यावर अटकेचे सावट होते. माध्यमांमधून सुरू झालेली अटकेची चर्चा त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा राणे सुरुवातीला संतापले. अटकेची शक्यता फेटाळताना त्यांनी माध्यमांना खटला भरण्याचा दम दिला. आपल्याला अटक होणार नाही, अशीच राणे यांची देहबोली होती. केंद्रात भाजपचे सरकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे आपल्या सोबत आहेत, असे सांगत राणे यांनी अटक करण्यासारखे काहीच नसल्याचे मंगळवारी सकाळी 10 वाजता चिपळुणात सांगितले. त्याचवेळी राज्याचा गृह विभाग राणे यांच्या अटकेची सर्व तयारी करीत होता. एकीकडे अटक होणार असे ठामपणे सांगणारे राणे दुसरीकडे अटक टाळण्याची धडपड करत होते. वकिलांची टीम त्यांनी कामाला लावली होती. मात्र रत्नागिरीच्या स्थानिक न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. राणे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. सायंकाळी अ‍ॅड. निकम यांनी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची प्रत नसल्याने न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आणि कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. त्यावर बुधवारीच सुनावणी होणार असल्याने मंगळवारी संध्याकाळीच राणे यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला.

राणेंना जेवताना उठवले

संगमेश्वरमधून नारायण राणे यांना ताब्यात घेताना नेमके काय घडले याचे निरनिराळे कथन केले जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडीओ जारी केला. त्यात नारायण राणे हे नाचणीची भाकरी आणि भाजी असे जेवण करत सोफ्यावर बसलेेले दिसतात. तेवढ्यात पोलिस आत येतात आणि राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार निलेश राणे व अन्य कार्यकर्त्यांची भिंत राणे आणि पोलिस यांच्यात उभी राहते. ही भिंत भेदून पोलिस राणेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. राणे हातात ताट घेऊन उभे आहेत. पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात प्रचंड वाद सुरू असून नीलेश राणे तावातावाने पोलिस अधिकार्‍यांना बोलताना दिसतात…

राणे जेवत असताना त्यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली. ज्या पद्धतीने पोलिस आणि रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग राणे यांच्याशी वागले, त्याचा आम्ही निषेध करतो, असे भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले. राणे यांना जेवतानाच अटक होत असताना प्रसाद लाड राणेंच्या सोबत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार साहेब जेवत आहेत, असे सांगण्यात आल्यानंतर पोलिस अधिकारी व त्यांचे पथक बराच वेळ बाहेर थांबले आणि अखेरीस आत घुसले. राणे यांना अटक करण्यात आली. संगमेश्वर पोलिस स्टेशनच्या मागच्या दाराने राणे यांना घेऊन पोलिस ताफा महाडकडे रवाना झाला. अटकेनंतर राणे तणावात दिसत होते.

रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने राणेंचा ट्रान्झीट बेल नाकारला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सेना-भाजप राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ना. राणे यांच्या वकिलांनी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात ट्रान्झीट बेलसाठी अर्ज केला होता. मात्र, रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. ना. नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात चार ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पहिला गुन्हा नाशिक पोलिस स्थानकात दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिस रत्नागिरी दौर्‍यावर असलेले ना. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी मंगळवारी दुपारी संगमेश्वरमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी ना. राणे यांनी आपल्या वकिलांमार्फत रत्नागिरीतून नाशिकमध्ये जाताना अटक करू नये यासाठी ट्रान्झीट बेलसाठी अर्ज केला होता. मुळात ना. राणेंना ट्रान्झीट बेलची आवश्यकता नसल्याचे सांगत जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.

राणेंवर दाखल गुन्ह्यांच्या कलमांचा अर्थ

भारतीय दंड विधान कलम 500

हे कलम बदनामी किंवा अब्रूनुकसानीच्या शिक्षेबाबत आहे. एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीची बदनामी केली तर बदनामी करणार्‍या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत सामान्य कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. हे कलम अदखलपात्र व जामीनपात्र आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला सत्र न्यायालयात हजर केले जाते.

भारतीय दंड विधान कलम 505 (2)

ज्या विधानांमुळे एखादी व्यक्ती देशाविरुद्ध किंवा सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होईल, ज्या विधानांतून जनतेत किंवा एखाद्या भागात भीती किंवा भयग्रस्तता निर्माण करण्याचा उद्देश असेल किंवा तसे होण्याची शक्यता असेल, त्यावेळी भारतीय दंड विधान कलम 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला जातो. सामाजिक सलोखा धोक्यात येईल, समाजामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होईल अशा विधानांबाबत या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो. यानुसार तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. हे कलम अदखलपात्र व अजामीनपात्र आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला कोणत्याही दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले जाते.

भारतीय दंड विधान कलम 153 ब (1)(क)

हे कलम राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे आरोप किंवा निवेदन करणार्‍या, देशाची सार्वभौमता आणि अखंडता यांना धक्का पोहोचवणार्‍या विधानाबाबत आहे. यानुसार तीन वर्षांची शिक्षा, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हे कलम दखलपात्र व अजामीनपात्र आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला प्रथमवर्ग दंडाधिकार्‍यांसमोर हजर केले जाते.

भादंवि 500 व 505 (2) या कलमाअंतर्गत तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. यापैकी भादंवि 153 (ब) हा दखलपात्र गुन्हा असून, इतर गुन्हे अदखलपात्र आहेत.
-अ‍ॅड. अजय मिसर,
सरकारी वकील, नाशिक

Back to top button