नारायण राणेंविरोधात महाड येथे गुन्हा दाखल | पुढारी

नारायण राणेंविरोधात महाड येथे गुन्हा दाखल

महाड; पुढारी वृत्तसेवा : जन आशीर्वाद यात्रेनिमित्त रायगडच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचे उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान करणारे वक्तव्य करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. आणि समाजातील एकोप्यास बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड येथील पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणासंदर्भात टीका करून मी त्या ठिकाणी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चढवली असती, असे वक्तव्य करून राणेंनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला.

तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या तसेच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचे उद्देशाने व समाजातील एकोप्यास बाधा आणण्याची कृती केली. त्यांच्या या वक्तव्याने धार्मिक, वांशिक, भाषिक व प्रादेशिक गटामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊन असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

मुख्यमंत्री हे लोकसेवक असताना त्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करून नुकसान पोहोचवण्याचा धोका निर्माण केला व सदर व्हिडिओ क्लिपव्दारे समाजात शत्रुत्व द्वेषभाव व दुष्टावा निर्माण केला.

असा दावा करत याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम संहिता १५३ अ (१) (ब) (क), १८९, ५०४, ५०५ (२), ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : परदेशात कमावण्याची संधी देते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण |

Back to top button