Raigad Rain : रोह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली (video) | पुढारी

Raigad Rain : रोह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली (video)

रोहे : महादेव सरसंबे : रोहा शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशी ही मुसळधार पाऊस कायम आहे. (Raigad Rain) गुरुवारी रोहा तालुक्यात सकाळपासूनच पावसाचा जोर दिसून आला. रोह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कुंडलिका नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कु़ंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. कुंडलिका नदीचे उपनदी गंगासह अन्य नाले भरुन वाहत होते. डोंगर माथ्यावरुन येणारे नाले ही भरुन वाहत होते. हे सर्व पाणी कुंडलिका नदीच्या पात्रात आल्याने कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे. (Raigad Rain)

रोह्यात जोरदार पाऊस पडल्याने कुंडलिका नदी भरुन वाहत असल्याने रोहा अष्टमी जुना पुल बुधवारी वाहतुकीस बंद करण्यात आला होता. कुंडलिका नदीच्या पात्रात पाणी कायम असल्याने खबरदारी म्हणून तिसऱ्या दिवशीही जुना रोहा अष्टमी पुल वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरपरिषद कर्मचारी, पोलिस तैनात करण्यात आले होते. रोहा अष्टमीस जोडणाऱ्या मोठ्या पुलावरुन वाहतूक सुरू होती.

कुंडलिका नदीची पाण्याची पातळी वाढत असल्याने रोहा व अष्टमी परीसरात रोहा नगरपरिषदेच्या वतीने खबरदारी नागरिकांनी घ्यावी, यासाठी रिक्षा फिरवून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी नाले भरुन वाहत होते. संपूर्ण वातावरण ढगाळ व पाऊसमय झाले होते.

Back to top button