रायगड : मासे पकडताना दोन जण गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडला | पुढारी

रायगड : मासे पकडताना दोन जण गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडला

पेण पुढारी वृत्तसेवा : पेणमधील पावसाचा जोर गेले तीन दिवस कायम असून या पावसामध्ये दोन व्यक्ती नदीकिनारी मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या वाहून गेल्याची दुःखद घटना पेणमध्ये घडली आहे. यातील मुंगोशी येथील लक्ष्मण काशिनाथ चौरे ( वय ४२ ) हे चार जुन रोजी मासेमारी करण्यासाठी गेले असता ते पावसाच्या पाण्यात वाहुन गेले होते. आज त्यांचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील उरण येथे सापडला. तर पेण तालुक्यातील बेलवडे येथील दौलत माया पवार ( वय ६०) हे देखील ५ जुन रोजी मासेमारी करण्यासाठी गेले असता ते देखील पावसाच्या पाण्यात वाहुन गेले आहेत. मात्र दौलत पावर यांना शोधण्यात अद्याप प्रशासनाला यश आले नसून त्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

चांदेपट्टी येथील ५६ जणांना केले स्थलांतरित

पावसाचा इतर ठिकाणचा विचार केला असता तालुक्यातील महलमिऱ्या डोंगर ( चांदेपट्टी) येथील २६ कुटुंबातील ५६ जणांना मराठा समाज हॉल अंबेघर येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर कांदळेपाडा येथील झालेल्या पूरसदृश परिस्थितीचा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी पाहाणी करून आढावा घेतला आहे. दुसरीकडे पेण बस स्थानकासमोरील पाच विद्युत खांब उन्मळून पडले असुन हे खांब नव्याने उभे करण्याचे काम सुरू असल्याने या भागातील विद्युत पुरवठा दिवसभर खंडीत झाला होता. तर दिवसभरात तालुक्यातील रोडे, करंबेली आणि वरसई फाटा येथील प्रत्येकी तीन गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button