शिवसेनेच्‍या ४२ आमदारांसह ५० आमदार एकनाथ शिंदेसोबत : भरत गोगावलेंची माहिती | पुढारी

शिवसेनेच्‍या ४२ आमदारांसह ५० आमदार एकनाथ शिंदेसोबत : भरत गोगावलेंची माहिती

महाड; श्रीकृष्ण द. बाळ : शिवसनेचे ४२ व अपक्ष ८ असे एकुण पन्नास आमदार आमच्याबरोबर आहेत.  लवकरच राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांनी आज (दि. २३) सकाळी महाडमधील पत्रकारांशी भ्रमणध्वीवरून बोलताना दिली.

आमदार भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गुवाहटी येथे आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी टाकल्याने गोगावले यांचे राजकीय महत्त्‍व वाढले आहे. आज सकाळी त्यांच्याशी संपर्क साधला असता 42 सेना आमदारांसह एकुण 50 आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही पक्ष सोडणार नाही, सर्वांना बरोबर घेवून जाण्याची भूमिका आम्ही घेतली असल्याचे गोगावले यांनी सांगितले. राज्यपालांना भेटण्यासाठी शिंदे यांच्यासमवेत मुंबईत येणार असल्याचे त्यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

महाडमध्ये शिवसैनिकांची बॅनरबाजी

आमदार भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, गेले दोन दिवस महाडमधील शिवसैनिकांमधून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आज महाड शहरात युवा सनेने शिंदे आणि गोगावले यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत.

हेही वाचलंत का ?

Back to top button