शिवराज्याभिषेक दिन विशेष : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या बांधणीला किती खर्च आला? | पुढारी

शिवराज्याभिषेक दिन विशेष : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या बांधणीला किती खर्च आला?

पुढारी ऑनलाईन डेस्क

रायगडाचे असे कोणते वैशिष्ट्य होते की, त्याला पाहताक्षणी दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीच्या ह्रदयात घर करावे. झालेही असेच जावलीच्या मोऱ्यांचा पाडाव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम रायगडावर पाऊल ठेवले तेव्हाच हा गड त्यांच्या मनात बसला. पुढे त्याची स्वराज्याची राजधानी करण्याच्या दृष्टीने बांधणी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तेथेच झाला. तीन बाजुंनी नैसर्गिक कातीव कडे आणि एका बाजुला हिरोजी इंदूलकर यांच्या कल्पनेतून आलेला बेलाग बुरुज आणि पुर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या रायगडाला स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व होते. तो नेमका होता तरी कसा? याची उत्सुकता अनेकांना असते.

स्वराज्याचे वास्तुविषारद हिरोजी इंदलकर यांच्या अथक मेहनतीतून राजधानी अस्तित्वात आली. त्यानंतर ६ जून, १६७४ रोजी राज्याभिषेक करून घेतला. हिंदुस्थानच्या इतिहासातील हा दुर्मीळ सुवर्णक्षण पाहण्यासाठी अनेक जीव तळमळत होते. या गडावर हा सोहळा होण्याआधी आणि राज्याभिषेक करून घेण्यासंबधीच्या पार्श्वभूमीचा उल्लेख कृ. अ. केळुस्कर यांच्या शिवचरित्रात सविस्तर करण्यात आला आहे.

सैनिकी स्थापत्यशास्त्राचा जगातील सर्वोत्तम नमुना

रायगड ही स्वराज्याची राजधानी होती, तो बेलाग, दुर्गम होत, हे सर्व खरे असले तरी त्याची बांधणी आणि मूळचे नैसर्गिक रूप हे सैनिकी स्थापत्यशास्त्राचा जगातील सर्वोत्तम नमुना असल्याचे पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगतात. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध’ ग्रंथात रायगडाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या इ. स. १६५६ मध्ये मोऱ्यांचा पाडाव झाल्यानंतर ज्यावेळी शिवाजी महाराज रायगडावर आले तेव्हाच त्यांना या किल्ल्याचे महत्त्व लक्षात आले. स्वराज्यांचा विस्तार वाढत असल्याने राजगडावरून राज्यकारभार रायगडावर हलविला. समुद्रसपाटीपासून २८५१ फूट उंच असलेला हा किल्ला अभेद्य आणि अजिंक्य होता. विस्तीर्ण गडमाध्यावरून राज्यकारभार सुरू झाला.

रायगडाच्या निवडीबाबत बोलताना पुराततत्व विभागाचे वास्तूसंवर्धक वरुण भांबरे म्हणाले, ‘त्यावेळी शिवाजी महाराज स्वराज्यविस्ताराच्यादृष्टीने आरमार उभा करत होते. या आरामारावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनारपट्टीपासून जवळ असलेल्या रायगडाचे महत्त्व महाराजांनी ओळखले होते. रायगडाचे बेलागपण, दुर्गमत्व हे आधीच सिद्ध झाले होते. गडावरील इमारतींचे विश्लेषण केले तर हा सैनिकी वास्तुशास्त्राचा जगातील अद्भूत आणि सर्वोत्तम नमुना असल्याचे आपल्या लक्षात येते. सैनिकी वास्तूशास्त्राचा नमुना म्हणून जो जगप्रसिद्ध जिब्राल्टर किल्ला आहे त्याच्याशी त्याची तुलना केली. शिवकालीन परदेशी पाहुणे आणि अनेक देशांच्या वकिलांनी पुर्वेकडील जिब्राल्टर (जिब्राल्टर ऑफ इस्ट) असे त्याचे वर्णन केले आहे. त्यांनी वर्णन केल्यानुसार हा सैनिकी वास्तूशास्त्राच्यादृष्टीने इतका महत्त्वाचा गड आहे की, यावर जर धान्यसाठा आणि मुबलक सैन्य असतील तर हा जगाविरुद्ध लढू शकतो. सैनिकी वास्तूशास्त्राच्या दृष्टीने या किल्ल्य्याच्या तटबंदीकडे पाहिले तर भुईकोट किल्ल्यांना पुर्ण तटबंदी उभी करावी लागते. रायगडाच्या तीन बाजू या ताशीव कडे आहेत. निसर्गानेच ते तासून ठेवले होते. एकच बाजू जी आत्ताचा पायरी दरवाजा असलेल्या चित्तदरावाजाकडील. महादरवाजाकडील उतार असल्याने शत्रू वर येण्याची शक्यता होती. तिथे तटबंदी बांधली गेली. महादरवाजासारखा गोमुखी दरवाजा बांधला. गोमुखी दरवाजा म्हणजे शत्रूच्या टप्प्यात येत नाही आणि दुरून दिसतही नाही. बुरुज दिसतात पण दरवाजा दिसत नाही. दरवाजा दोन्ही बुरुजांच्या कुशीत वसला आहे. हा वास्तूशास्त्राचा अद्भूत नमुना आहे. गडकोटांच्या बांधकामाबाबत महाराजांनी जे आज्ञापत्रांचे दस्ताऐवज पाहिले तर त्यानुसार ही बांधणी केली आहे. त्यात नमूद केलेल्या सर्व गोष्टी पुरेपूर त्यात वापरल्या गेल्या आहेत. तटबंदी इतक्या तीव्र उतारावर आहे की ती कशी बांधली गेली असेल हा आजच्या आर्किटेक्ट आणि इंजिनिअरना पडलेला प्रश्न आहे.’

रायगडाच्या बांधणीसाठी प्रचंड खर्च

इ. स. १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी किल्लेबांधणीचे बजेट जाहीर केले. यात ५० हजार होन रायगडासाठी राखीव ठेवले. इतकेच नाही तर त्यातील घरे, तळी, गच्ची, तट यासाठी किती खर्च करायचा हेही ठरवून दिले, असा संदर्भ बावडा दप्तरात आढळतो. सावंत यांच्या शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध या ग्रंथातही याबाबत सविस्तर विवेचन आहे. त्यात म्हटले आहे, ‘एवढी प्रचंड रक्कम खर्च करून शिवरायांनी रायगडाची उभारणी केली ती स्वत:च्या राजधानीसाठीच.’

याबाबत सभासद बखरीत केलेला उल्लेख असा, ‘राजा खासा जाऊन पाहतां गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे दीड गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावरील गत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु उंचीने थोडका, दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा गड हाच करावा.’

हा किल्ला हिरोजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली बांधला गेला. तो बांधत असताना या किल्ल्याचे बेलागपण कमी होईल, असे एकही बांधकाम तेव्हा झाले नाही. गडावर साडेतीनशेपक्षा जास्त इमारती होत्या. त्यातील बहुतांश इमारती या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या. काही आधीच्या होत्या. मात्र, शिवकालीन इमारती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रायगडावर महाराजांआधीही राजसत्ता होत्या, पण तेथे कधीही राजधानी नव्हती. राजधानीचे स्वरुप देण्यासाठी जे करायची गरज होती ते महाराजांनी केले. त्यात महत्त्वाचे म्हणजे पाणवठ्यांची निर्मिती. रायगडावर जवळपास ८४ पाणवठे आहेत. गंगासागर आणि हत्तीतलाव हे सगळ्यात मोठे टाके आहेत. राजधानी करायची असेल तर तेथे मुबलक पाणी असायला हवे. इतक्या वर पाणी नेऊ शकत नसल्याने पाण्याच्या साठ्याला महत्त्व दिले. गडावरील इमारतींचे बांधकाम करत असताना जे दगड काढले गेले त्यातून हे तलाव तयार झाले. या तलावांची निर्मितीही अशी करण्यात आली की, एक तलाव भरल्यानंतर दुसरा तलाव भरला जाईल. शिवाय गडावर पडणारा प्रत्येक थेंब या तलावांमध्ये साठला जाईल असे नियोजन केले गेले. आज शहराशहरांमध्ये महापालिका ज्यासाठी प्रयत्न करते ते महाराजांनी साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी केले होते.

नियोजनबद्ध बांधणी

स्वराज्याच्या राजधानीला शोभेल अशीच रायगडाची शिवरायांनी बांधणी केली. या गडाचे जुने नाव रायरी असे होते. ते बदलून रायगड असे ठेवले. गडावर उंच राजवाडे, उपवने, तलाव विहिरी, बाजारपेठांची रांग, घरे, गजशाळा, धान्य कोठारे बांधली. आजही यातील काही इमारतींचे अवशेष आहेत. यात सुस्थितीत असलेली बाजारपेठ पहायला मिळते. घोड्यावर बसून बाजारहाट करता येईल अशा पद्धतीने या पेठेची निर्मिती केली होती. याशिवाय जगदीश्वर मंदिर, नगारखाना या वास्तूही आज उभ्या आहेत.

कवी भूषण याने रायगडाचे वर्णन काव्यमय पद्धतीने केले आहे, ‘शिवरायांनी सर्व किल्ल्यांचा आधार रायगडास आपले वस्तीस्थान केले आहे. या किल्ल्यावरील शिवाजीराजांचा दरबार आणि तेथील ऐश्वर्य पाहून कुबेरही लाजू लागला आहे. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तिन्ही लोकीचे वैभव साठवले आहे. किल्ल्याचा भूभाग जलमय पाताळाप्रमाणे, माची पृथ्वीप्रमाणे आणि वरील प्रदेश इंद्रपुरीप्रमाणे शोभतो. रायगडावर शिवरायांचे रत्नखचित महाल शोभ आहेत. गडावर विहिरी, सरोवरे आणि कूप बिराजत आहेत.

साडेतीनशे वास्तूंना ड्रेनेज सिस्टीम

राजधानी रायगडावर साडेतीनशेहून अधिक वास्तू होत्या. सध्या सातमहालाच्या मागे असलेली ड्रेनेज सिस्टिम आपल्याला दिसते. परंतु गडावरील सर्व वास्तूंमध्ये शौचालय आणि ड्रेनेज सिस्टिम होती. गडावर पाणी असले तरी फ्लशसिस्टिम नव्हती तरीही या ड्रेनेज सिस्टिममुळे कुठेही दुर्गंधी येणे किंवा अन्य कोणताही प्रकार होत नव्हता. ही सिस्टिम आजही उपयोगी आहे, ती जर दुरुस्त करून पर्यटकांना वापरायला दिली तर ती अधिक व्यवहारी ठरेल.

जेथे मावळे तेथे पाणी

रायगडावर ८४ पाणवठे होते. हे पाणवठे अशा पद्धतीने खोदले होते की, जेथे मावळे पहाऱ्यावर असतील तेथे त्यांना पाणी मिळायला हवे. शत्रूने वेढा घातला तरी काहीच फरक पडणार नाही, अशा पद्धतीने गडाची रचना करण्यात आली होती. भुयारी मार्ग, भक्कम बांधकाम आणि ताशीव नैसर्गिक कडे हे या गडाचे वैशिष्ट्य होते.

चित्तदरवाजा, नानेदरवाजा आणि वाघ दरवाजा हे रायगडावरील दरवाजे. यातील वाघ दरवाजा सहजासहजी कुणालाच सापडत नाही. गडावर शत्रूने हल्ला केल्यास गडावरील शिबंदी सुरक्षितरित्या बाहेर पडावी, यासाठी गडावरून भुयारी दरवाजा काढण्यात आला. हा दरवाजा गडाच्या पोटातून जंगलात जातो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या खूनानंतर शत्रूने रायगडावर हल्ला केला तेव्हा महाराणी येसूबाई यांनी राजपरिवार याच वाघदरवाजाने बाहेर काढला होता. या दरवाजाला वाघ दरवाजा असे नाव का पडले याबाबत माहिती घेतली असता फारशी माहिती मिळाली नाही. परंतु असे म्हटले जाते की, ज्याला वाघाचे काळीज असेल तेच या दरवाजातून जाऊ शकत असतं.

हे ही वाचा :

Back to top button