तळीये ग्राऊंड रिपोर्ट : ८४ निष्पाप जीव चिरडल्यानंतर तरी जाग येणार का? - पुढारी

तळीये ग्राऊंड रिपोर्ट : ८४ निष्पाप जीव चिरडल्यानंतर तरी जाग येणार का?

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान आचार्य : तळीये ग्राऊंड रिपोर्ट : प्रत्येक गावाच स्वतःच एक अस्तित्व असतं. ते गाव चालत बोलतं होत ते तिथे राहणाऱ्या व्यक्तींमुळे. तिथे असलेल्या सजीव आणि निर्जीव गोष्टीमुळे. इतकेच नव्हे तर ते गाव बाहेरच्या नागरिकांनाही तेथील निसर्ग सौंदर्याने जणू काही साद देत असतात.

गावालगत असणारे डोंगर अगदी दिमाखात स्वागत करण्यासाठी सज्ज असतात. मात्र डोंगराखाली राहणाऱ्यांना कुशीत घेऊन सावली देणारे डोंगर स्वतःच खचतात आणि तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांना तेथील सजीव निर्जीव प्रत्येक गोष्टीला आपल्या पोटात सामावून घेतात तेव्हा होतो एक कधीही भरून न निघणारा आघात.

इतकं सगळ झाल्यानंतरही उरलेला डोंगराचा भाग मात्र दिमाखात उभा असतो. आपल्यामुळे काहीच झालं नाही अस येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तो ठणकावून सांगत असतो.

तळीये ग्राऊंड रिपोर्ट : अशीच कथा या तळीये गावाची. या गावाची एक वाडी जी डोंगराच्या कुशीत वसलेली. जिथे छान गोकुळ नांदत होत. पहाटे अरवणारा कोंबडा, पाखरांचा किलबिलाट, त्यानंतर भल्या पहाटे उठणारे ग्रामस्थ , दूध काढण्यासाठी येणाऱ्या मालकाची वाट पाहणारे गाई वासर , प्रत्येकाच्या घरातून दरवळणारा चहाचा सुवास, महिलांचा घरातील काम आवरण्याचा उरका, शेतीची लगबग आणि तोंडावर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाची तयारी त्याच बरोबर बाप्पाच्या दर्शनाला यावर्षी तरी मुलाने किंवा नवऱ्याने नक्की गावात यावं म्हणून कोण्या आईचा, कोण्या बायकोचा प्रेमळ आग्रह हे सगळं एका क्षणात थांबलं आणि लागलीच ऐकू येऊ लागला फक्त आणि फक्त आक्रोश.

नेमका नशिबाला दोष द्यायचा की सावली धरणाऱ्या डोंगरावर जोरात ओरडायच हा यक्ष प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. मदत तर मिळेलच हो, पण माणूस कसा परत येईल? या विचाराने पुन्हा पुन्हा आलेला हुंदका आवरता येत नाही.

काय झालं, कस झालं हे प्रश्न देखील आता त्रासदायक होत आहेत. प्रत्येकाला उत्तर देऊन थकायला झालंय. रात्रीची झोप नाही सतत तो दिवस आणि तो क्षण डोळ्यासमोर येतो. रोज वाटेवरून जाणारी दिमाखात उभी असलेली टुमदार घर दिसत नाहीत.

दिसतोय फक्त अर्धा खचलेला डोंगर, खाली आलेला मातीचा खच, डोळ्यात साठलेले असंख्य प्रश्न आणि अनावर झालेले अश्रू ही झाली तळीये ची अवस्था.

तळीये ग्राऊंड रिपोर्ट : अशीच परिस्थिती पट्ट्यात राहणाऱ्या प्रत्येकाची आहे. काही ठिकाणी शांत वाहणाऱ्या नद्यांचे पाणी शहरात शिरले आणि आता डोळ्यांमधून येणाऱ्या अश्रुंच्या रूपाने ते बाहेर पडत आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तर अनेकांचे चिखलगाळ स्वच्छ करून कंबरडे मोडले आहे.

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत त्यांना सतावत आहे. निसर्गाची ही अवहेलना आपण केली त्याची परतफेड तो करत आहे का असा प्रश्न सध्या सर्वच स्तरातून विचारला जात आहे. मात्र हा प्रश्न चार दिवसाचा असून प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधीच हा प्रश्न हवेत विरतो.

पुढील वर्षी पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली की पुन्हा आपल्याला जाग येते. त्यामुळे होणारे नुकसान टाळायचे असेल तर निसर्ग संवर्धन करणे हाच पर्याय हाती उरला असून आता लख्ख जागे होण्याची गरज आहे.

मदतीसाठी अनेक हात मात्र योग्य ठिकाणी मदत पोहोचत नाही

मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र कोकण, कोल्हापूर, सांगली या भागाला मदत करत आहे. मात्र अद्यापही योग्य वितरण होत नसल्याची खंत येथील लोक व्यक्त करत आहे.

मदतीसाठी येणाऱ्या गाड्या रस्त्यातच थांबवल्या जात आहेत. यासाठी एक सरकारी केंद्र ठरवून सगळ्यांनी आपली मदत तेथे द्यावी आणि नंतर त्याचे वितरण व्हावे अशी व्यवस्था हवी. यामुळे प्रत्येकाच्या घराघरात जाऊन मदत करणे सोपे होईल. यामुळे जे स्वाभिमानाने जगणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत पोहचेल अशी आशा आहे.

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

हेलिकॉप्टरमधुन महाड पुराचे टॉप व्हू

महाड आज सकाळची छायाचित्रे-चवदार तळे परिसर

Back to top button