संभाजीराजे यांनी दिल्लीत घेतली जी. किशन रेड्डी यांची भेट - पुढारी

संभाजीराजे यांनी दिल्लीत घेतली जी. किशन रेड्डी यांची भेट

रायगड; पुढारी वृत्तसेवा: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नूतन केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी रायगड विकास प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेतली.

रायगड विकास प्राधिकरणाने भारतीय पुरातत्त्व विभागास २०१८ साली ११ कोटी रूपयांचा निधी दिलेला असून त्यापैकी पुरातत्त्व विभागाने गेल्या साडेतीन वर्षांत केवळ ६० लाख रूपयांचीच कामे केलेली आहेत व उर्वरीत निधी तसाच पडून असल्याचे सांगितले.

अधिक वाचा 

संभाजीराजे आणि रेड्डी यांच्यात चर्चा

भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्खनन व जतन संवर्धनाची कामे अजूनही हाती घेतलेली नाहीत. केवळ सहाच ठिकाणी उत्खनन करण्यात आलेले असून इतर वाड्यांच्या उत्खननाची कामे हाती घेतलेली नाहीत. तरी, या कामांना गती देऊन निश्चित वेळेत ती पूर्ण करावीत, याबाबत संभाजीराजे आणि रेड्डी यांच्यात चर्चा झाली.

रायगडावरील हत्ती तलाव व इतर पाणवठे, महादरवाजा तटबंदी, नाणे दरवाजा यांचे जतन व संवर्धनाची कामे मागील चार वर्षांत प्राधिकरणाच्या मार्फत सुरू आहेत. तसेच फरसबंद, पायरीमार्ग, स्वच्छतागृहे, भूमिगत विद्युत वाहिन्या अशी विकासात्मक कामेदेखील प्राधिकरणामार्फत सुरू असल्याची माहिती रेड्डी यांनी संभाजीराजे यांना दिली.

अधिक वाचा 

२०१८ साली पंतप्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये रायगडावरील मुख्य वास्तूंच्या जतन संवर्धनाची जबाबदारी देखील पुरातत्त्व विभागाने रायगड विकास प्राधिकरणाकडे द्यावी, असे ठरले होते. मात्र, अजूनही पुरातत्त्व विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे संभाजीराजे यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच या बैठकीत भारतीय पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर देखील ‘रायगड मॉडेल’च्या धर्तीवर जतन संवर्धन करण्यात यावे, असे सुचविण्यात आले.

अधिक वाचा 

तसेच महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते स्वराज्याची राजधानी रायगडपर्यंत असलेल्या खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग या जलदुर्गांना सागरी मार्गाने जोडून गेटवे ऑफ इंडियापासून ते दुर्गराज रायगडापर्यंत ‘सी फोर्ट सर्कीट टूरिझम’ प्रकल्प राबविण्याबाबत ही चर्चा झाली.

या सर्व बाबींवर त्वरीत एक उच्चस्तरीय बैठक घ्यावी, असे मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली. तसेच लवकरच दुर्गराज रायगडला भेट देईन असे यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button