मुंब्रा-पनवेल महामार्गावर टँकरमधून गॅस गळती | पुढारी

मुंब्रा-पनवेल महामार्गावर टँकरमधून गॅस गळती

पनवेल; विक्रम बाबर : रायगड जिल्ह्यातील मुंब्रा-पनवेल महामार्गावर एका गॅस वाहतुक करणा-या टँकरला गळती लागच्याची घटना समोर आली आहे. खिडुक पाडा येथे ही घटना घडली आहे. टँकरमधून गॅस गळती झाल्याने महामार्गावर वाहतुक कोंडी झाली.

अधिक माहिती अशी की, तळोजा औद्योगिक वसाहतीमधून कार्बन डाय-ऑक्साइडची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती होण्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तळोजा अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासह धाव घेतली. त्यानंतर अथक प्रयत्नांती वायू गळती नियंत्रणात आणली.

अधिक वाचा :

दरम्यान, टँकरमधून वायु गळती होत असल्याचे लक्षात येताच परीसरातील नागरीक व महामार्गावरील इतर वाहनधारक भयभीत झाले. काही वाहनधारक आपली वाहने रस्त्यातच सोडून दूर ठिकाणी गेले. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचत काहीवेळातच टँकरमधून होत असलेली वायू गळती नियंत्रण आणली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिक वाचा :

गॅस गळती; धुळे तालुक्यातील नेर शिवारातील घटना

दरम्यान, राज्यातील इतरही ठिकाणी टँकरमधून गॅस गळती झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशी एक घटना धुळे जिल्ह्यातील नेर शिवारा येथे घडली आहे. अधिक माहिती पुढील प्रमाणे आहे.

गुजरातच्या भरुच येथून चाळीसगाव येथे जाणाऱ्या टँकरमधून धुळे तालुक्यातील नेर शिवारात गॅस गळती सुरू झाली आहे. या टँकरमधून एलएनजी गॅस गळती होत आहे. हा गॅस ज्वालाग्रही नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून टँकर एका हॉटेलच्या आवारात लावण्यात आला आहे.

भरुच येथून जीजे 12 व्ही टी 3160 या क्रमांकाचा टँकर गॅस घेऊन नागपूर सूरत महामार्गावरून चाळीसगाव येथे जात होता. हा टँकर धुळे तालुक्यातील नेर शिवारात पोहोचल्यानंतर त्यातून गॅसची गळती सुरु झाली. ही बाब चालकाच्या लक्षात आली.

महामार्गावर एकेरी रहदारी सुरू करून टँकर उभा असलेल्या लेनची वाहतूक थांबवण्यात आली.

दरम्यान, या टँकरमध्ये लिक्विड नॅचरल गॅस असून त्यापासून सीएनजी गॅस बनवला जातो. तसेच हा गॅस स्फोटक तसेच ज्वालाग्रही नसून तो जड असल्याने जमिनीवर पडतो. त्यामुळे धोका कमी आहे.

हा टँकर एका हॉटेलच्या आवारात लावण्यात आला. दरम्यान, गॅस कंपनीने तातडीने दुसरा टँकर पाठवला व तज्ज्ञांच्या मदतीने गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यास सुरुवात करण्यात आली.

Back to top button