रायगड : माणगाव तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला, रोह्यातही मुसळधार | पुढारी

रायगड : माणगाव तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला, रोह्यातही मुसळधार

रायगड; पुढारी वृत्तसेवा :

माणगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा माणगावशी संपर्क तुटला आहे. माणगावमधील काळनदीचे पात्र तुडुंब भरले असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात गुरुवार दि. २२ जुलै सकाळपर्यंत १६८ मिमी इतकी पावसाची नोंद झाली असून हवामान खात्याने २४ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

गेली आठ दिवस रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. माणगाव तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

तालुक्यातील कळमजे, खरवली, बामणोली, निळगुन, जावळी, मुगवली, तळेगाव, रिळे, पाचोळे, निजामपूर विभागातील गावे, गोरेगाव व लोणेरे विभागातील गावे, मोर्बा व पळसगाव विभागातील आतील असणाऱ्या गावांना पावसाच्या पाण्याचा वेढा पडल्याने अनेक गावांतील लोकांचा माणगाव संपर्क तुटला आहे.

माणगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी कामाधंद्यानिमित्त ग्रामीण भागातील लोक येत असतात. या लोकांचा माणगाव संपर्क तुटला आहे. पुढील ४८ तासांत हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नदीकाठच्या गावांतील लोकांनी तसेच ग्रामीण भागातील लोकांनी सावधानता व सतर्कता बाळगण्याचे आवाहन माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.

१३ गावे आणि ६ वाड्यांचा संपर्क

शिरवली नदीवरून पुराचे पाणी दोन दिवसापासून वाहत असल्यामुळे तुटला आहे. या नदीची २० फुट उंची आहे. तर लांबी ८० फुट आहे.

शिरवली, सांगी, टिटवे, मालुस्ते, थरमरी, येलावडे, बडदेमाच, जिते, उंबर्डी, साखळेवाडी, बोरवली, बोरमाच कुर्डुपेठ, कुंभळमाच, सांगी आदिवासीवाडी, उंबर्डी आदिवासीवाडी, उंबर्डी बौद्धवाडी, जिते आदिवासीवाडी, जिते बौद्धवाडी, बोरवली बौद्धवाडी या शिरवली गावाजवळ दोन नद्यांचा संगम होतो.

एक हुंबर्डी गावाकडून येणारी नदी दुसरी पुणे हद्दीतून येणारी नदीचा संगम शिरवली गावाजवळ होतो त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन नदीच्या पुलावर पाणी येऊन गावांचा संपर्क सुटतो. हा पूल अनेक वर्षाचा असून या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे

रोह्यात मुसळधार पाऊस, कुंडलिका नदीचे रुद्र रूप

रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेले आठवडाभर पावसाने जोर धरला असताना बुधवारी रात्री रोह्यात जोरदार पाऊस बरसला आहे. गुरुवारी दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला असून शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण वातावरण पाऊसमय झाला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

रोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने डोंगरदऱ्यातून नदी नाले ओढे भरून वाहत आहेत. त्यामुळे रोह्याची जीवन वाहिनी कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहत आहे कुंडलिकेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी दिसत आहे. त्यामुळे कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केले आहे.

रोहयात जोरदार पाऊस पडत असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण वातावरण पाऊस मय झाले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.

कुंडलिका नदीचे उपनदी असलेल्या गंगा व गुजर नाला या दोन्ही तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.

मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भात शेती मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. भातशेती च्या लावणीचे काम अंतिम टप्प्यात असताना पावसाने तडाखा दिला आहे.

कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनाने कुंडलिका नदीच्या दोन्ही तिरावरील वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रोहा तालुक्यातील कुंडलिका व अंबा नद्यांची धोका पातळी ओलांडली असून नदी किनारी सखल भागातील पाणी भरले आहे. सर्व यंत्रणांना व नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

रोहा अष्टमी ला जोडणारा रोहा अष्टमी पुलाला पाणी लागले असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर कायम राहून वाढण्याची शक्यता आहे आपल्या डोलवाहाळ धरणाची धोक्याची पातळी ही ओलांडली आहे त्यामुळे आपल्या कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी वाढु शकते तरी नागरीकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी विनाकारण घराबाहेर जाऊ नये व दमखाडी, अष्टमी तील नदीकिनारील सखोल भागात असणाऱ्या लोकांनी ही विशेष काळजी घ्यावी व सतर्क राहावे.
संतोष पोटफोडे नगराध्यक्ष : रोहा अष्टमी नगरपरिषद

Back to top button