मोबाईलचे व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम हळूहळू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबापासून लांब घेऊन जात आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राममुळे तरुण पिढी वेळेचा अपव्यय करीत असताना बैलगाडा शर्यतीच्या नादात तरुण पिढी बाद होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. बैलगाडा घाटात तरुण पिढी वेळ वाया घालवत असेल तर भविष्यात त्यांचे कुटुंब तसेच समाजाला मोठ्या प्रमाणावर वाईट परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे येणार्या काळात तरुणांनी सर्वच गोष्टींचा विचार करून पुढे जाणे गरजेचे आहे.
आई-वडील शेतात राबतात. मात्र, तरुण मुले बैलगाडा घाटात बैलांच्या मागे फिरताना दिसत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला आहे. सध्या पावसामुळे बैलगाडा शर्यतीचे प्रमाण कमी झाले असले, तरी पाऊस थांबल्यानंतर या शर्यती पुन्हा सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाला की आई-वडील भर उन्हात शेतीच्या कामात, तर मुले बैलगाडा घाटात, असे चित्र सध्या दिसते. प्रगतशील तालुका म्हणून ओळख असलेल्या बारामती तालुक्यातही बैलगाडा शर्यतीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाऊ लागले आहे. तरुण मुले कामधंदा सोडून या बैलगाडीच्या पाठीमागे धावताना दिसतात. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी तसेच बैलगाडा शर्यतीमध्ये बैल धरण्यासाठी, अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थ्यांसह तरुण पिढी गुंतल्याचे दिसून येत आहे. तरुणांचा कुटुंबाला हातभार अपेक्षित असताना अनेक तरुण वेळेचा अपव्यय करीत आहेत.
बैलगाडा शर्यतीबरोबरच क्रिकेट स्पर्धांमध्येही लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जात असल्याने या खेळात देखील शालेय विद्यार्थी आपला वेळ वाया घालवत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. रोजगाराचे कमी झालेले प्रमाण, व्यवसायात आलेली मंदी, शेतमालाला नसलेले बाजारभाव, यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आलेली असताना रोजगारक्षम तरुणांनी कुटुंबाला हातभार लावणे गरजेचे आहे.