स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई वेबसिरीज आणि पॉर्न वेबसाइटच्या आहारी जात आहे. अश्लील कंटेंटमुळे त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होत असून, लहान मुली तसेच महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याची विकृती वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ओटीटी चॅनेल्सवर आता सर्वाधिक अश्लील वेबसिरीज पाहायला मिळत आहेत. अनेकजण रात्र-रात्र जागून या वेबसिरीज पाहात आहेत. त्यासोबतच पॉर्न साइटवर जाऊनसुद्धा असे व्हिडीओ पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांच्यातील भावना उत्तेजित होत असून, विकृत लोकांकडून असे चुकीचे प्रकार घडत आहेत. हे रोखण्यासाठी शासनाला आता ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
विविध पॉर्न वेबसाइटवर अश्लील कंटेंट पाहण्यासाठी आपण 18 वर्षांवरील आहात का? या संदर्भात विचारणा केली जाते. हो म्हटल्यावर संबंधित कंटेंट तत्काळ दाखविला जातो. परंतु, कंटेंट पाहणारा 18 वर्षांवरील आहे का? याची कोणतीही खातरजमा संबंधित वेबसाइटकडून केली जात नाही. त्यामुळे 18 वर्षांच्या आतील तरुणाई या कंटेंटला बळी पडत असल्याचे समोर येत आहे.
व्हिडिओ व्हायरल होण्याचा मोठा ट्रेंड आला आहे. समाज माध्यमावर कोणताही व्हिडिओ व्हायरल झाला की, देशाच्या आणि जगाच्या कानाकोपर्यातील तरुणाई कशाचीही पर्वा न करता अश्लील कमेंटद्वारे व्यक्त होत आहे. अक्षरश: अश्लील कमेंटचा पाऊस पडत आहे. काही कमेंट चांगल्या तर काही एकमेकांची उणी-दुणी काढून अश्लीलतेपर्यंत पोहोचवणार्या आहेत. हे पाहून अन्य तरुणही बिनधास्तपणे समाज माध्यमांवर अशा कमेंटद्वारे व्यक्त होत आहेत. सध्याच्या घडीला तरुणाईच्या या विचाराबाबत आता तज्ज्ञांनाही पूर्णत: गोंधळून टाकले आहे.
मुली आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यानंतर शासन तसेच राज्यकर्त्यांकडून विविध उपाययोजना राबविण्याच्या घोषणा केल्या जातात. तरीही अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये सहभागी तसेच अन्य तरूणांची मानसिकता बदलण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
ज्या प्रकारे बलात्काराच्या घटना कानावर येत आहेत. अशा घटना घडण्याचे कारण म्हणजे तरुणांना वेबसिरीज व पॉर्न साइट्स बघण्याचे लागलेले व्यसन. याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर व वर्तवणुकीवर भयानक पद्धतीने होतो. परिणामी, या लैंगिक बाबतीतील विचारांमुळे अपराधीपणाची भावना वाटणे, दु:ख, नैराश्य, चिंता, सतत एकच कृती व विचार करणे, सतत लैंगिक सुख मिळविण्याची इच्छा होणे किंवा लैंगिक सुखाबद्दल अनिच्छा निर्माण होणे, अमली पदार्थाचे सेवने, जोडीदारासोबत परस्पर संबंध बिघडणे अशी लक्षणे दिसू लागतात. यामुळे समोरच्या एखाद्या मुलीकडे बघण्याची मानसिकता बदलते. त्याचा परिणाम विकृतीमार्गे बाहेर येतो. ही विकृती रोखण्यासाठी पॉर्न साइट्स भारतामध्ये बंद केल्या पाहिजे.
सुप्रिया साबळे, मानसोपचार तज्ज्ञ.