दोन दलित युवकांना 25 ते 28 जणांच्या जमावाकडून मंगळवारी (दि. 17) रात्री दहाच्या सुमारास बेदम मारहाण करण्याचा प्रकार भिगवण (ता. इंदापूर) येथे घडला. यामध्ये हे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बुधवारी भिगवणमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण होते. भिगवण पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यासह 28 जणांवर अॅट्रॉसिटी अॅक्टसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. येथील अमर बौद्ध युवक संघटनेकडून संबंधित संशयित आरोपी युवकांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.19) भिगवण बंदचे आवाहन केले आहे.
सिद्धेश तानाजी शेलार व अर्जुन गणेश शेलार (दोघे रा.भिगवण, ता.इंदापूर, जि.पुणे) अशी जखमी युवकांची नावे आहेत. सिद्धेश शेलार याच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य अमितकुमार वाघ यांच्यासह अक्षय भरणे, अमोल वाघ, अतुल गाडे, रोहित गाडे, साहिल गाडे, विजय गुणवरे, अजय गुणवरे, अंकुश गाडे, राहुल गाडे, रोहित भरणे, बाळा भरणे, ऋतिक चव्हाण(गुणवरे), सनी जाधव, विशाल गाडे, भावेश धवडे (सर्व रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे)
यांच्यासह इतर अनोळखी दहा ते बारा जणाविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट तसेच बेकायदेशीर जमाव जमवणे,गंभीर स्वरूपाच्या जखमा करणे,जातीवाचक बोलून अश्लील शिवीगाळ करणे आधी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश शेलार व अर्जुन शेलार हे दुचाकीवरून जारच्या बाटलीतून पाणी आणण्यासाठी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भिगवण येथील विरांश चौकातील एका पाण्याच्या दुकानात गेले होते. पाणी घेऊन परत श्रीनाथ चौकातून निघाले असता तेथे दारू पिऊन नाचत असणार्यास त्यांच्या दुचाकीचा धक्का लागल्यावरून बाचाबाची होऊन जमावाने सिद्धेश शेलार व अर्जुन शेलार यांना जातीवाचक शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी तसेच लोखंडी गज, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर भिगवणमध्ये मंगळवारी रात्रीच तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता; परंतु बुधवारी सकाळी घटनेचे पडसाद उमटू लागले.अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने भिगवण पोलिस व ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देत संबधित युवकांच्या अटकेची मागणी करीत गुुरुवारी भिगवण बंदची हाक दिली आहे. सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.