एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनामुळे पुणे विभागातील 550 फेर्या रद्द झाल्या. बसअभावी अनेक प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले, तर काही प्रवाशांना अवाच्या सव्वा पैसे देऊन खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. दरम्यान, विभागातील सासवड, भोर, तळेगाव आदी स्थानके पूर्णत: बंद राहिली. स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) येथे सुद्धा एसटी कर्मचार्यांनी जोरदार आंदोलन केले, याचाही प्रवाशांवर मोठा परिणाम झाला.
पुणे शहर आणि जिल्ह्यात 13 आगार आहेत. या आगारांतून रोज 800 बस धावत असतात. मात्र, आंदोलनामुळे दिवसभरात सुमारे 250 बस धावल्या. सुमारे 550 बस कर्मचार्यांअभावी धावू शकल्या नाहीत. स्वारगेट, पुणे रेल्वेस्थानक आणि शिवाजीनगर (वाकडेवाडी) ही महत्त्वाची बसस्थानके अंशत: सुरू होती. त्यामुळे रोजच प्रवाशांच्या गर्दीने गजबजणार्या या बसस्थानकात दिवसभर तुरळक प्रवासी होते. बसस्थानकांत शांतता पाहून अनेक प्रवासी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून निघून गेले.
सात ऑगस्टच्या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत एकमत न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी बैठकच घेतली नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचार्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. या बैठकीसाठीच आम्ही आंदोलनाची तारीख 9 ऑगस्टवरून 3 सप्टेंबर केली होती. आमच्या प्रश्नांवर मार्ग निघत नसल्याने आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला. या आंदोलनाला राज्यभरात कर्मचार्यांकडून प्रतिसाद मिळाला. 70 टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय झाली तर त्यास शासन जबाबदार असेल.
संदीप शिंदे, महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती