शिवाजी शिंदे
राज्यात तृतीयपंथी नागरिक आता शासनाच्या विविध योजनांमुळे मुख्य प्रवाहात येत असून, उच्च शिक्षणासाठी संपूर्ण फीमाफीसह साडेतीन हजार तृतीयपंथींना शासकीय ओळखपत्र मिळाल्याने ते स्वबळाबर उभे राहत आहेत. त्यामुळे आता त्यांना सिग्नलवर उभे राहून जगण्याचा संघर्ष कमी होण्यास मदत होईल.
उच्च दर्जाची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि तुमच्या-आमच्यासारखीच व्यवहारक्षमता असतानाही केवळ समाजाने बहिष्कृत केल्याने तृतीयपंथींची ओळख ही प्रत्येक चौकातील सिग्नलवर जगण्यासाठी पैसे मागणे, हीच दिसते. मात्र, अनेक तृतीयपंथींनी संघर्ष करीत उच्च शिक्षणाची कवाडे स्वत:साठी उघडली, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांत जे झाले नाही ते अलीकडील काही वर्षांत त्यांनी करून दाखविले आहे. सिग्नलवर पैसे मागणारे लाचार जीवन ते शिक्षिका, असा प्रवास काहींनी केला आहे.
सिग्नलवर पैसे मागणार्या तृतीयपंथींना पाहून लहान मुले आई-बाबांना त्यांच्याबाबत अनेक प्रश्न विचारतात. मात्र, त्याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. कारण, हे नागरिक आजवर मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले. त्यामुळे समाजात त्यांना ओळख नव्हती. मात्र, शासनाने त्यांना ओळखपत्र देण्याची मोहीम हाती घेतली असून, राज्यातील 36 जिल्ह्यांतून एकूण 4 हजार 729 अर्ज ऑनलाइन आले. त्यापैकी आजवर 3 हजार 635 नागरिकांना तृतीयपंथी असल्याचे ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्यात आले. सुमारे 500 अर्ज प्रलंबित आहेत. सर्वाधिक तृतीयपंथींची नोंदणी ठाणे 1005, पुणे 851, तर मुंबईत 572 नागरिकांची नोंदणी झाली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथींची तक्रार निवारण समिती झाली असून, त्याचे प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू झाले आहे.
24 मे 2021 पासून त्यांना ओळखपत्र देण्यासाठी राष्ट्रीय पोर्टल तयार करण्यात आले आहे. नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स या संकेतस्थळावर ओळखपत्र देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा, तालुकापातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
आरोग्य तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन.
7 डिसेंबर 2023 पासून तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
मोफत शस्त्रक्रियांसाठी जिल्हावार मंडळे स्थापन.
नांदेडमधील जिल्हाधिकारी कार्यालयाने सेजल गौरी बकस यांना सेतू सुविधा केंद्र चालविण्याची परवानगी देऊन पहिली शासकीय स्तरावरील स्वयंम रोजगाराची संधी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील बाह्यस्रोताद्वारे (आउट सोर्सिंग) रोजगार दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आळवेकर यांना राज्यातील शासकीय शिक्षिका होण्याचा बहुमान दिला.