नुकत्याच सुरू झालेल्या स्वारगेट मेट्रो स्थानकाची एक एन्ट्री (प्रवेशद्वार) चालू आहे, तर तीन अजूनही बंद आहेत. यासोबत मंडई मेट्रो स्थानकाची एक आणि कसबा पेठ मेट्रो स्थानकाची एक एन्ट्री बंद आहे. म्हणजेच तीनही मेट्रो स्थानकांच्या सध्याच्या घडीला प्रत्येकी एक-एक एन्ट्रीच सुरू आहेत. प्रलंबित कामे पूर्ण करून बंद असलेल्या एन्ट्री सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झाल्यानंतर महामेट्रो प्रशासनाकडून स्वारगेट ते सिव्हील कोर्ट हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. प्रवासी सेवादेखील सुरू झाली. मात्र, प्रवाशांना आत जायला आणि बाहेर यायला एकच प्रवेशद्वार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फेरफटका मारावा लागत आहे. तसेच, आगामी काळात प्रवाशांची गर्दी वाढल्यावर एकच प्रवेशद्वार अपुरे पडणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करून स्थानकांच्या सर्व एन्ट्री खुल्या कराव्यात, अशी मागणी पुणेकर प्रवाशांकडून केली जात आहे.
पीएमपीएमएल, गणेश कला क्रीडा एमएसआरटीसीकडील एन्ट्री बंद.
एसटीच्या प्रवाशांना रस्ता धोकादायकरीत्या ओलांडून यावे लागते.
गणेश कला क्रीडा टिळक रस्त्याकडील प्रवाशांना लांबून स्वारगेट स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे यावे लागते.
बाजीराव रस्त्याने प्रवास करणार्या प्रवाशांना मंडई स्थानकात जाणे सोपे आहे.
पीएमपीच्या प्रवाशांची मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर नित्याचीच गर्दी होत आहे.
सरकते जिने
लिफ्टची सुविधा
सीसीटीव्ही
माहितीदर्शक एलईडी स्क्रीन
सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्मवर सेफ्टी डोअर
एसी/वातानुकूलित यंत्रणा
फायर यंत्रणा - साधे जिने
ऑनलाइन, ऑफलाइन तिकीट काउंटर सुविधा
मेट्रोने सुरू केलेल्या मंडई, कसबा पेठ आणि स्वारगेट या तीनही स्थानकांच्या प्रत्येकी एकच एन्ट्री सुरू आहेत. त्यामुळे आम्हाला वळसा घालून जावे लागत आहे. परिणामी, मोठी पायपीट होत आहे. तसेच, भविष्यात येथे गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने इतर प्रवेशद्वार लगेच खुले करावे.
अतुल बोकण, प्रवासी