

संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी आत्ताच करा. याचबरोबर पंजाब सरकारप्रमाणे प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा, अशी मागणी करताना थोरात कारखान्याने कायम चांगली वाटचाल केली असून यावर्षी थोरात कारखाना प्रति टन 3200 रुपये भाव देणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. Thorat sugar factory rate 2025(Latest Ahilyanagar News)
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025- 26 या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, तर व्यासपीठावर ॲड माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, उपाध्यक्ष पांडुरंग घुले, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत, संचालक संतोष हासे, संपतराव गोडगे, डॉ तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, सौ लताताई गायकर, सौ सुंदरबाई डूबे, बंडू नाना भाबड, मदन आंबरे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर थोरात कारखान्याने कायम काटकसर, अचूकता व पारदर्शक निर्णय घेत चांगली वाटचाल केली आहे. कारखानदारीमध्ये मोठी स्पर्धा आहे. उसाची पळवा पळवी होणार आहे. दरवर्षी किमान नऊ लाख मेट्रिक टन गाळप होणे हे गरजेचे आहे .थोरात कारखान्याने 15 लाख मेट्रिक टना पर्यंत गाळप करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्र बाहेर सभासद व ऊस उत्पादकांचा कारखान्यावर कायम मोठा विश्वास राहिला आहे. आगामी काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.
यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला मात्र मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले. शेतीचे मोठे नुकसान झाले अशा काळामध्ये सरकारने पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत केली पाहिजे. याचबरोबर शेतकऱ्यांना आत्ताच कर्जमाफी करा. आता त्यांना खरी गरज आहे. याचबरोबर सततच्या पावसाने अकोले, संगमनेर तालुक्यामधील अनेक पिके वाया गेली आहेत, आपण मंत्री असताना 2005-2006 शेतकऱ्यांना एकरी मोठी मदत केली होती, तशी मदत आता मिळाली पाहिजे.
डॉ.तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्याला दिशादर्शक असे कारखान्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम चांगले निर्णय घेतले जात असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर हा कारखाना देशातील कारखान्यासाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राजेंद्र चकोर, नानासाहेब शिंदे, सुरेश थोरात, शांताराम कडणे, नवनाथ आंधळे, विष्णुपंत रहाटळ, विठ्ठल असावा, सिताराम वर्पे, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, तर नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी आभार मानले.
नुसते फ्लेक्स लावू नका, मदतही करा !
संगमनेर तालुका हा सततच्या विकास कामातून आपण वैभवशाली बनवला. आज सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेरचे नाव अग्रगण्य आहे. मात्र तालुक्याला काही लोक तालुक्याला बदनाम करत असून खोट्या नाट्या केसेस टाकल्या जात आहे. बाहेरच्या संदेशावर ते काम करत आहे. नुसते फ्लेक्स लावू नका तर मदत करा, अशी मागणी थोरात यांनी केली.
काटा मारणाऱ्यांवर कारवाई व्हावीच!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला व त्यावर कारवाई करणार, असे म्हटले हे अत्यंत अभिनंदनीय आहे. त्यांनी अशा कारखान्यांवर कारवाई केलीच पाहिजे. यामधून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याने त्यांचे अभिनंदन असल्याचे माजी कृषि व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.