प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथील कच्चा परवाना परीक्षा विभाग म्हणजेच लर्निंग लायसन्स एक्झाम हॉल येथे चोरी झाल्याची घटना सोमवारी (दि.14) उघडकीस आली आहे. विकेंड आणि सणासुदीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत, चोरट्याने लर्निंग लायसन्स एक्झाम विभागात घुसखोरी केली. या विभागातील दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि वायफाय राऊटर घेऊन चोरट्याने धूम ठोकल्याची माहिती आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
शनिवार, रविवार आणि दसरा निमित्ताने मिळालेल्या सुट्ट्यामुळे पुणे आरटीओ कार्यालय गेले दोन दिवस बंद होते. याचाच फायदा घेत कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या झाडीतून चोरटा आत घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. आत आल्यानंतर चोरट्यांनी सर्वप्रथम खिडकीचे रेलिंग तोडून परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला आणि येथील दोन सीसीटीव्ही कॅमेरे वायफाय राऊटर घेऊन धूम ठोकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परीक्षा हॉलमध्ये लर्निंग लायसन्ससाठी आवश्यक असलेले संगणक देखील होते. मात्र, या कशालाही चोरट्यांनी हात लावला नसल्याचे आरटीओ कडून सांगण्यात आले आहे. अशा घटना आरटीओ कार्यालयात होत असतील तर येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे समोर आले आहे.
तसेच कार्यालयाला दोन दिवस सुट्टी होती, मग येथील सुरक्षा व्यवस्थेचे आरटीओकडून नियोजन करण्यात आले आहे की नाही, आले असेल तर मग सुरक्षा रक्षक चोरी होत असताना कुठे होते, असा सवालही यावेळी कच्चा परवाना परीक्षार्थीनकडून विचारला जात आहे.
आरटीओ अधिकारी म्हणाले, या घटनेबाबत आम्ही माहिती घेतली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार देण्याचे काम सुरू आहे. घटनेचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. येथे उद्भवलेल्या परिस्थितीचा कच्चा परवाना परीक्षेवर कोणताही परिणाम झाला नसून येथील कामकाज सुरळीत सुरू आहे.