

पुणे: मिलिंद देशमुख याच्याकडील सर्व्हंट्स ऑफ इंडिया संस्थेसंबंधीचे सर्व आर्थिक अधिकार काढून सचिवपदावरून हकालपट्टी केली असली, तरी संस्थेतील महत्त्वाची कार्यवाही अर्धवट सोडून संस्थेचे अध्यक्ष दामोदर साहू गावी निघून गेले आहेत. त्यांना या प्रकरणामुळे प्रचंड टेन्शन आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. देशमुखला पाठीशी घालण्यात त्यांचाच मोठा हातभार असल्याचा आरोप संस्थेतील काही पदाधिकारी आणि सदस्यांनी केला आहे.
गोखले इन्स्टिट्यूटच्या आर्थिक घोटाळ्यात सर्व्हंट्स ऑफ इंडिया संस्थेच्या सचिवपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर मिलिंद देशमुखची रवानगी सध्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. नागपूर येथील मालमत्ता फ्री होल्ड प्रकरणात देशमुख व तत्कालीन कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी विकासकामांच्या नावाखाली मोठ्या रकमा वापरल्याचा आरोप होत आहे.
त्या दोघांनी जे कारनामे केले, त्याची खबर सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (सीस) आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स (जीआयपीई) संस्थांच्या इतर पदाधिकार्यांना लागू दिली नाही, असा आरोप होत आहे. संचालक मंडळातील आठपैकी पाच सदस्यांनी तसा जबाब दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
तत्कालीन कुलगुरू रानडेंवर कारवाई का नाही..?
आर्थिक लाभासाठी अडचण होऊ नये म्हणून देशमुखनेच अजित रानडे यांना पात्र नसताना कुलगुरू केले. मात्र, डॉ. अजित रानडे यांचे बिंग फुटण्याआधी ते राजीनामा देऊन मोकळे झाले, असा आरोप आता सदस्य करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल संचालक मंडळ आणि गोखले इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी करीत आहेत.
अध्यक्ष दामोदर साहूंनी राजीनामा द्यावा...
संस्थेतील पदाधिकारी आणि सदस्यांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार, असे पोलिसांनी सांगताच सर्व दस्तऐवज जमा केल्यानंतर अध्यक्ष दामोदर साहू यांचे धाबे दणाणले अन् ते ओडिशा राज्यातील कटक या गावी निघून गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बहुतांश संचालक आणि सदस्य साहू यांच्यावर नाराज असून, त्यांनी राजीनामा द्यावी, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आयकर विभागाकडे तक्रारी...
संस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात लढणारे सदस्य प्रवीणकुमार राऊत यांनी धर्मादाय आयुक्तांसह आयकर विभागात देखील तक्रार दिली आहे. कारण, प्रेमकुमार द्विवेदी यांनी उत्तर प्रदेश शाखेच्या पेचपडवा येथील संस्थेची जागा अवघ्या 17 लाख रुपयांमध्ये विकली. त्यामुळे अध्यक्ष साहू, वरिष्ठ सदस्य प्रेमकुमार आणि मिलिद देशमुख हे कारवाईस पात्र आहेत, असा गंभीर आरोप होत आहे.
प्रेमकुमार द्विवेदींची सारवासारव...
संस्थेतील 84 वर्षांचे वरिष्ठ सदस्य प्रेमकुमार द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत बोलणे टाळले. मात्र, गावी जाताच त्यांनी दोनपानी प्रसिद्धिपत्रक सोमवारी (दि. 14 एप्रिल) प्रसारमाध्यमांकडे पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, संस्थेतील दीड कोटींचा व्यवहार हा कायदेशीर असून, तो तत्कालीन कुलगुरू अजित रानडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या संमतीनेच झाला आहे. मात्र, द्विवेदी यांनी आपले म्हणणे प्रत्यक्ष उपस्थित असताना का मांडले नाही? असा सवाल पदाधिकारी करीत आहेत.
संस्थेने मिलिंद देशमुखकडून आर्थिक व्यवहार काढून घेतल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. मात्र, बँकेला त्याबद्दल न कळवता संस्थेच्या कारभाराची जबाबदारी सुव्यवस्थित विभागून न देता बेजबाबदारपणे अध्यक्ष दामोदार साहू हे गावी निघून गेले. त्यांनी आपली नैतिक जबाबदारी निभावली नाही, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे आम्ही करणार आहोत.
- प्रवीणकुमार राऊत, सदस्य, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी