पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त दहीहंडीचा थरार

शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत फोडली हंडी
The people of Pune experienced the thrill of joint Dahi Handi
संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवलाPudhari
Published on
Updated on

‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, आकर्षक विद्युतरोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत आणि त्यावर थिरकणार्‍या तरुणाईचा लोटलेला जनसागर, अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित 35 सार्वजनिक मंडळांच्या संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लालमहाल चौकात तुडुंब गर्दीसमोर शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळविला.

शहरातील चौकचौकांत होणार्‍या दहीहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षाव्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन संयुक्त दहीहंडी कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. 35 सार्वजनिक गणेश मंडळांनी या उपक्रमाला पाठिंबा देत या संयुक्त दहीहंडीत सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ऐतिहासिक लालमहाल चौकात या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. चौरंगी पँडलमध्ये आकर्षक विद्युतरोषणाईने ही दहीहंडी पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.

सायंकाळी चारच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला समर्थ, नादब्रह्म, शिवमुद्रा, युवा वाद्य पथक या ढोल पथकांनी केलेल्या ढोल-ताशा वादनाने संपूर्ण परिसरात उत्साह भरला. डीजेच्या वादनाला सुरुवात झाल्यानंतर उत्साहाला आणखीनच उधाण आले. त्यात अधूनमधून पावसाच्या सरींची हजेरी आणि देहभान विसरून हजारोंच्या तरुणाईमुळे वातावरण जोशपूर्ण झाले होते. महिला आणि तरुणांची संख्याही मोठी होती. या अशा उत्साहपूर्ण वातावरणात वीस गोविंदा पथकांनी सलामी देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यात मुंबईतील चेंबूर येथील तरुणी आणि महिलांच्या पथकाने दिलेली सलामी लक्षवेधक ठरली.

रात्री साडेनऊच्या सुमारास कसबा पेठेतील शिवतेज दहीहंडी संघाने सात थर लावत ही पहिली संयुक्त हंडी फोडली. आयोजक पुनीत बालन व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

संयुक्त दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सार्वजनिक मंडळांचा मी आभारी आहे. अतिशय उत्साहात पुणेकरांनी या दहीहंडीला उपस्थित राहून सहभाग घेतला. त्यांचाही मनापासून आभारी आहे. पोलिस प्रशासनाने सहकार्य करीत आणि सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. त्यामुळे निर्विघ्नपणे हा कार्यक्रम पार पडला, त्यासाठी पोलिस प्रशासनाचे आभार.

- पुनीत बालन, युवा उद्योजक

आयोजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीचच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी अभिनेता प्रवीण तरडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यासह राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या संयुक्त दहीहंडीला हजेरी लावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news