खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात सध्या डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात या रुग्णांच्या तपासणी आणि औषधोपचारासाठी रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रक्ततपासणीसाठी केवळ दहा नमुने (सॅम्पल) घेण्याची मर्यादा असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रक्ततपासणीच्या नमुन्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
डॉ. आंबेडकर रुग्णालयात डेंग्यू आणि चिकुनगुनियासदृश आजारांच्या रुग्णांची तपासणी आणि औषध उपचारांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बदलत्या वातावरणामुळे सध्या विषाणुजन्य आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची तातडीने तपासणी आणि औषधोपचार केले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, एका दिवसाला केवळ रक्त नमुने तपासण्याची मर्यादा आहे. यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी घरी परत जावे लागत आहे.
रुग्णालयात केसपेपर घेण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच तपासणी, पैसे भरण्यासाठी आणि रक्त लघवीचे नमुने तपासण्याच्या विभागातही रुग्णांच्या रांगा लागत आहेत. मात्र अनेकवेळा थांबूनसुद्धा रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीस घेतले जात नसल्याने रुग्णांकडून संताप व्यक्त होत आहे.
कान-नाक-घसा, मेडिकल, त्वचा, नेत्र तपासणीसह विविध विभाग आहेत. मात्र, अनेक रुग्ण तपासणीसाठी सध्या मेडिकल विभागातच येत असल्याने या विभागावर ताण वाढला आहे. मेडिकल विभागात सध्या दोनच डॉक्टर आहेत. रुग्णाच्या संख्येच्या तुलनेत डॉक्टर कमी पडत आहेत. अन्य विभागांमध्ये रुग्णांची संख्या तुरळक असते. यामुळे मेडिकल विभागात सकाळच्या ओपीडी सत्रमध्ये आणखी डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.