आशिष देशमुख
महापालिकेच्या विद्युत विभागातील गोंधळाचे वृत्त प्रसिद्ध होताच कार्यालयाच्या संकेतस्थळावरील कंत्राटदारांसह बोगस कर्मचार्यांची नावे आणि मोबाईल नंबर असणार्या याद्याच गायब झाल्या आहेत. दरम्यान या विभागातील अनेक घोटाळे बाहेर येत असून नागरिकांनी दै. पुढारीला फोन व मेल करून त्या कळविण्यास सुरुवात केली आहे. नागरिक म्हणतात, आमच्या तक्रारींची पोचपावती कुणीही देत नाही. एक फाईल दुस-या टेबलवर जाण्यास चक्क काही महिने वाट पहावी लागत आहे.
दैनिक पुढारीने महापालिकेच्या विद्युत विभागात सुरू असलेल्या गोंधळावर प्रकाश टाकला. नाट्यगृहासह सांस्कृतिक केंद्रांमध्ये लाईट, साऊंड किंवा विजेशी संबंधित कामे करणारे या पूर्वीचे कंत्राटदार आणि त्यांच्याकडे काम करीत असलेले कामगार यातील गोंधळाबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर मात्र तत्काळ या विभागाने सार्वजनिक स्वरुपात संकेतस्थळावर दिसणारी या विभागातील कामगारांची यादीच गायब केली आहे. त्यामुळे या विभागात गोंधळ सुरू असून अधिका-यांनी तो लपविण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या संशयाला पुष्टी मिळते.
या विभागाचे वृत्त प्रसिद्ध होताच नागरिकांनी ई-मेल, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर आपल्या तक्रारी पाठण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार सध्या महापालिकेत कधीही गेले तर अधिकारी जागेवर नसतात. त्यामुळे आम्ही ई-मेल किंवा रजिस्टर पोस्टाने तक्रारी पाठवतो, पण त्याची पोचपावती, तक्रारीच्या फाईलची स्थिती ती कोणत्या अधिकार्याकडे आहे, याची माहितीच दिली जात नाही.
पुणे महापालिकेच्या कंत्राटदार या सदराची लिंक गायब करण्यात आली आहे. संकेतस्थळावर कंत्राटदार सदर असे टाकताच ‘फॉरबिडन’ म्हणजे ‘प्रवेश निषिद्ध’ असे लिहून येते. या याद्या तपासल्या तर असे लक्षात येते की, झोनवार कामगारांच्या याद्या आहेत. त्यांचे पगार किंंवा पेमेंट दिले आहे की नाही यासह कामगाराचे नाव, मोबईल नंबरही यात आहेत.