अष्टविनायकाचे आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव (ता. बारामती) येथे श्रीमयूरेश्वराचा ऐतिहासिक सीमोल्लंघन पालखी मिरवणूक सोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत शोभेच्या दारूची आतषबाजी करून बाजार पटांगणावर रावण दहन करण्यात आले. यानंतर सीमोल्लंघनासाठी श्रीमयूरेश्वराची पालखी मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाली. तब्बल 15 तास 41 मिनिटे हा सोहळा रंगला.
शनिवारी (दि.12) श्रीमयूरेश्वर मंदिरात पहाटे पुजारी गाडे व धारक यांच्या उपस्थितीत प्रक्षाळपूजा, पोशाख पूजेसह विविध धार्मिक विधी पार पडले. रात्री आठ वाजता श्रींच्या पालखीने सीमोल्लंघनासाठी प्रस्थान ठेवले. मंदिर प्रदक्षिणेवेळी पालखीसमोर शोभेच्या दारूची आतषबाजी तसेच ऐतिहासिक तोफेतून सलामी देण्यात आली. पालखीच्या अग्रभागी पाच मानाच्या तोफा, त्यानंतर पाच सनई, चौघड्याच्या बैलगाड्या, त्यामागे राजेशाही पालखी आणि सोबत अब्दागिरी, छत्र्या, चौर्या, असा लवाजमा होता.
पालखीचे नियोजन ग्रामजोशी किशोर वाघ यांनी केले. ही पालखी मुख्य पेठेतून बाजार पटांगणावरील आकर्षक पालखी स्थळी विसावली. रात्री बाजार पटांगणावर रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यानंतर पालखी मोरगाव चौकमार्गे श्रीसोनोबा मंदिरात पालखी विसावली. या मार्गक्रमणात शोभेच्या दारूच्या नळ्यांची आतषबाजी केली.