शंकर कवडे
लाडक्या बाप्पाला निरोप हा सर्वांसाठी भावनिक क्षण असला तरी टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता परिसरातील रहिवाशांसाठी मात्र तो मोठा क्लेशदायक ठरतो. विसर्जन काळात कर्णकर्कश आवाजात वाजविल्या जाणार्या डीजेमुळे घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले अन् प्राणीही धास्तावत असल्याने मंडळांकडून होणारा अतिरेक या परिसरातील रहिवाशांना मोठ्या यातना देऊन जातो. त्याअनुषंगाने, ‘कार्यकर्त्यांनो, विसर्जन मिरवणुकीच्या काळात दोन दिवस आमच्या घरातच राहून पाहा’ अशा स्वरूपाच्या संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांकडून उमटत आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियांतूनच या काळात त्यांना सोसाव्या लागणार्या यातनांची दाहकता स्पष्ट होते.
लाडक्या बाप्पाच्या निरोपाचा दिवस... बाप्पाच्या निरोपाने मन गहिवरून येणार इतक्यात सकाळी सातच्या सुमारास घराशेजारी मंडळाचा स्पिकर वाजू लागला अन् काळजाचा ठोका चुकला. दरवर्षीप्रमाणे डीजेच्या दणदणाटात मिरवणुका सुरू होणार असल्याची जाणीव झाली. पुन्हा कर्णकर्कश आवाज अन् बेसमुळे बसणार्या हादर्यांमुळे घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले अन् प्राणीही धास्तावले. वर्षोनुवर्षे हाच प्रकार सुरू असून पारंपरिक उत्सवाला प्राधान्य देण्यासह डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या चर्चा दरवर्षी रंगतात. याखेरीज, कागदी घोडेही नाचविले जातात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. डीजेशिवाय उत्सव साजरा होऊ शकत नाही का? याचा प्रत्येकाने विचार करावा. तसेच, ज्या कार्यकर्त्यांचा डीजेचा आग्रह असतो त्यांनी विसर्जन मार्गावरील एका घरात दोन दिवस राहून पाहावे, त्यांना सर्व काही उमगून येईल, ही भावना व्यक्त केली आहे, केळकर रस्ता परिसरात राहणार्या प्रदीप खरे यांनी.
जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता सोहळ्यादरम्यान झालेल्या डीजेच्या दणदणाटानंतर चर्चा रंगली ती मिरवणुकीदरम्यान झालेल्या ध्वनिप्रदूषणाची आणि काळजाचा ठोका चुकविणार्या स्पीकरच्या भिंतींचीच. वास्तविक ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुरेसे स्पष्ट आदेश दिले आहेत. आवाजाची पातळी किती असावी याचाही उल्लेख त्या आदेशांमध्ये आहे. पण सध्या फक्त वेळेची मर्यादा सोडली तर हे आदेशही धाब्यावर बसविले जात आहेत. विसर्जन मिरवणुकीमध्ये या सगळ्यांनी
कळस गाठल्याने या प्रकाराला आळा घालण्याचे धाडस कोण दाखविणार? असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. त्या अनुषंगाने दै. पुढारीने विसर्जन मार्गावरील रहिवाशांशी संवाद साधत त्यांचे मत जाणून घेतले.
मीही एका मंडळाचा कार्यकर्ता असून आमची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघते. मात्र, टिळक रस्त्यावरून निघणार्या डीजेच्या दणदणाटाचा त्रास हा दरवर्षी ठरलेलाच असतो. यामध्ये, माझ्या 83 वर्षीय आई व आमच्या कुत्र्याला मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यासाठी मी माझ्या आईला जवळच्या नातेवाईकांकडे दोन दिवस पाठवतो. कुत्र्याला पाठवणे शक्य नसल्याने तो आमच्याबरोबरच होता. मात्र, घराच्या वाजणार्या खिडक्या, कर्णकर्कश आवाज आणि हादरे यामुळे त्या मुक्या जिवाचे मोठे हाल होत होते. सर्व नियम असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होते, त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने याबाबत दाद मागायची कोणाकडे हाच प्रश्न असतो.
दिलीप टिकले, रहिवासी, टिळक रस्ता
माझे घर टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता यांच्यामध्ये येते. माझ्या घरात माझी 94 वर्षीय आई, 67 वर्षीय पत्नी व 71 वर्षीय मी असे राहतो. दरवर्षी डीजेपासून होणारा त्रास पाहता यावर्षी मी माझ्या आईला दुसर्या सदनिकेत शिफ्ट केले होते. घर मोकळे ठेवता येणे शक्य नसल्याने मी व माझी पत्नी घरात होतो. घराच्या काचा आवाज करत होत्या. तसेच, भिंती आणि झोपल्यानंतर पलंगही हादरत होते. डीजेचा अतिरेक थांबविण्याची गरज आहे. सण, उत्सव साजरा व्हावा मात्र तो इतरांसाठी त्रासदायक नसावा एवढीच अपेक्षा आहे.
अजित शहा, रहिवासी, अभिनव चौक
टिळक रस्त्यावर सहभागी होण्यासाठी देशभक्त केशवराव जेधे चौक, सारसबाग चौक तसेच महात्मा बसवेश्वर पुतळा येथून मंडळे अभिनव चौकात दाखल होतात. येथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळ होताच बहुतांश मंडळांकडून स्पीकर लावण्यास सुरवात झाली. एका चौकात आलेल्या मंडळांच्या डीजेच्या आवाजाची मोबाईल अॅपवर पाहणी केली असता परिसरात आवाज चक्क 103 डेसिबलपर्यंत नोंद झाली. ही नोंद माझ्यासाठी धक्कादायक होती, अशी माहिती सुभाषनगर येथील रहिवासी विनायक धारणे यांनी दिली.