सुवर्णा चव्हाण
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने पूजा साहित्याच्या खरेदीसाठीचीही लगबग सुरू झाली आहे. त्यामुळेच खरेदीसाठीचा शेवटचा शनिवार (दि. 31) व रविवार (1 सप्टेंबर) असल्याने पूजा साहित्यांच्या खरेदीवर अनेकांनी भर दिला. यंदा श्रीगणेश पूजेसाठी लागणार्या साहित्यांच्या बॉक्सला सर्वाधिक मागणी आहे. काहींनी सोशल मीडियाद्वारे ऑर्डर घ्यायला सुरुवात केली असून, त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. राज्यभरातील ग्रामीण भागातील गणेशभक्त पुण्यात येऊन पूजेच्या साहित्यांची खरेदी करत आहेत. कापूरपासून ते हळदी - कुंकूपर्यंतचे साहित्य खरेदी करण्यात येत आहे.
उत्सवासाठी काही दिवसाआधीच पूजेच्या साहित्यांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. यंदा पूजेच्या साहित्य खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. पूजेच्या साहित्यांच्या बॉक्सला सर्वाधिक मागणी असून, विशेष म्हणजे श्रीगणेश मूर्ती प्रतिष्ठापना, गौरी-गणपती, श्रीसत्यनारायण पूजेसाठी अशा पूजेच्या साहित्यांचा बॉक्स तयार करण्यात आला आहे. मंडळांकडून पूजेच्या साहित्यांच्या बॉक्सची मागणी वाढली आहे. या बॉक्समध्ये हळदी-कुंकवापासून ते फुलवातींपर्यंतच्या अनेक साहित्यांचा समावेश आहे. या बॉक्सची किंमत 200 ते 400 रुपयांपर्यंत आहे. एकत्रितपणे पूजेचे साहित्य एकाच बॉक्समध्ये असल्याने या बॉक्सला मागणी वाढली आहे. याशिवाय हळदी-कुंकू, बुक्का, कापूर, आसन, उपरणे, शेंदूर, अष्टगंध, वस्त्र, समई वाती, आरती पुस्तिका, उदबत्ती, फुलवाती, कापूस, रांगोळी...अशा साहित्यांच्या खरेदीलाही मागणी आहे. याचबरोबर पूजेसाठीचे कापड, आर्टिफिशिअल फुले, हार, तोरण हेही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पूजेच्या साहित्यांची किमत 20 रुपयांच्या पुढे आहे. पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी रविवार पेठेसह मंडईमध्ये लगबग पाहायला मिळत आहे.
व्यावसायिक धनंजय घोलप म्हणाले, पूजेच्या साहित्यांच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. यंदा श्रीगणेश पूजेसाठीचा बॉक्स आणि श्रीसत्यनारायण पूजेसाठीच्या बॉक्सला मोठी मागणी आहे. शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील गणेशभक्तही खरेदीसाठी येत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत मागणी आणखी वाढेल.
वेगवेगळ्या सुगंधी अगरबत्तीसह धूप खरेदीला यंदा प्रतिसाद आहे. कस्तुरी, चंदन, मोगरा, केवडा अशा विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्तीला मागणी आहे. विशेष म्हणजे दीड ते दहा फुटांपर्यंतच्या अगरबत्त्या आमच्याकडे उपलब्ध असून, गणेश मंडळांकडून या मोठ्या आकारातील अगरबत्तींना मागणी आहे.
- विष्णू शहा, व्यावसायिक
व्यावसायिकांकडून पूजेच्या साहित्यांच्या विक्रीसाठी ऑनलाइन प्रसिद्धीही केली जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपवर त्याबाबत प्रसिद्धी केली जात असून, छायाचित्रे, व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षी काही व्यावसायिकांनी पूजेचे साहित्य घरपोच पोहोचविण्यासाठीची सेवा उपलब्ध करून दिली आहे.