शंकर कवडे
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने लसूण, भेंडी, गवार, काकडी, फ्लॉवर, कोबी, घेवड्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
बाजारात रविवारी (दि.1) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 7 ते 8 टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, इंदौर येथून 7 ते 8 टेम्पो गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून 3 ते 4 टेम्पो भुईमूग शेंग, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 10 ते 12 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार पेटी, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा भागातून मटार 7 ते 8 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 60 ट्रक, इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा 40 टेम्पो आवक झाली.
जिल्ह्यासह विभागात पाउसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी, नेहमीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे घाऊकसह किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार कोथिंबिरीच्या एका जुडीला 60 ते 80 रुपये, मेथीच्या जुडीला 50 रुपये भाव मिळाला. उर्वरित पालेभाज्यांची 25 ते 40 रुपये जुडी भावाने विक्री होत आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 1) कोथिंबिरीची सुमारे 70 हजार जुडी, तर मेथीची 50 हजार जुडींची आवक झाली होती. ही आवक नेहमीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यातच होणार्या आवकमध्ये भिजलेल्या आणि दर्जाहिन मालाचे प्रमाण लक्षणीय आहे. ग्राहकाकडून मात्र दर्जेदार मालाला मागणी असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.लसूण, भेंडी, गवार, काकडी, फ्लॉवर, कोबी, घेवड्याचे भाव वधारले.