संतापजनक ! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
School girl molested
शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला File Photo
Published on
Updated on

पुण्याच्या हडपसर परिसरातील एका शाळेतील शिक्षकाने नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीचा पाठलाग करून आणि तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन शाळकरी मुलींवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यात हा प्रकार समोर आला आहे.

गणेश काकड असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 78, सह कलम 12, पोक्सो अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. काकड याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जुलै 2024 ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीमध्ये शिकते. ही मुलगी 26 ऑगस्ट रोजी घरी आली, त्या वेळी तिची ती रडत होती. आईने तिला रडण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने सर्व हकीकत सांगितली. जुलै 2024 मध्ये ती शाळेत असताना गणेश काकड या शिक्षकाने तिच्या घराचा पत्ता विचारला. तसेच, वर्गामध्ये शिकवत असताना त्याने ‘तू माझ्याकडे बघत जा. इकडे तिकडे बघत जाऊ नकोस. मी सुंदर आहे,’ असे म्हटले.

त्याला त्या मुलीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर काही दिवसांनी ही मुलगी घरी चालत निघालेली असताना आरोपी काकड हा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा होता. त्याने या मुलीला ‘तू घरी चालली आहेस का? मी तुला तुझ्या घरी सोडू का? तू कुठे राहतेस?’ अशी विचारणा केली. या संदर्भात पीडित मुलीने शाळेच्या उपप्राचार्य यांनाही कल्पना दिली. त्यांना भेटून हा सर्व प्रकार सांगितला. त्या वेळी उपप्राचार्यांनी काकड याला समजावून सांगण्याऐवजी या मुलीलाच ओरडण्यास सुरुवात केली.

त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही मुलगी शाळेच्या मैदानात उभी होते. त्या वेळी काकड तिचा पाठलाग करत तेथे आला आणि तिला ‘तू शिट्टी का वाजवली?’ असे विचारण्याचा बहाणा करून तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. सोबतच काकड हा नेहमी तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवतो आणि तिचा पाठलाग करून नेहमी बोलण्याचा प्रयत्न करतो. तसेच, जवळ येण्याचा प्रयत्न करतो, असे तिने आईला सांगितले. आईने मुलीला घेऊन हडपसर पोलिस ठाणे गाठले आणि त्यानंतर या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news