सर्व्हंट्स ऑफ इंडिया संस्थेवर आजवर कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे काही सदस्य, कर्मचारी हतबल झाले होते. मात्र, न्यायालय, पोलिस, धर्मादाय आयुक्त या संस्थांसह आता जनतेचाही रेटा सुरू असल्याने या संस्थेच्या भ्रष्ट कारभारावर चारही बाजूंनी वॉच असल्याचे चित्र आहे.
जुलैमध्ये रानडे ट्रस्टच्या प्रकरणात संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाल्यापासून न्यायासाठी प्रतीक्षेत असणार्यांना आशेचा किरण दिसला. गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरीही काही होईना, असे वाटत असतानाच संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक अचनाक अध्यक्षांनी बोलावली. ही बैठक 28 व 29 ऑगस्ट रोजी झाली. त्या दरम्यान डेक्कन पोलिसांनी आजी- माजी उपाध्यक्षांना चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यामुळे संस्थेत एकच खळबळ माजली. त्यानंतर धर्मादाय आयुक्तालयात विश्वस्त मंडळ बरखास्तीची तक्रार प्रवीणकुमार राऊत यांनी केल्याचे प्रकरण मंगळवारी सुनावणीस आले. यात पुन्हा संस्थेच्या वतीने वेळ मागून घेण्यात आला, त्यामुळे या प्रकरणावर 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
वरिष्ठ आजीवन सदस्यांचे बदल अर्जात रमाकांत लेंका व गंगाधर साहू ह्यांचे नाव न घालता अध्यक्षाचा मुलगा शेखर दामोदर साहू तसेच प्रेमकुमार द्विवेदीचे नातू प्रतीक द्विवेदी आणि मिलिंद देशमुख यांचा मुलगा चिन्मय मिलिंद देशमुख यांचे नाव संस्थेचे आजीवन सदस्य म्हणून नोंद घेण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे बदल अर्ज केला आहे. मात्र त्यावर संस्थेचे सदस्य प्रवीणकुमार राऊत यांनी हरकत घेतली आहे. संस्थेला कौटुंबिक संस्था होऊ द्यायचे नाही म्हणून जुलै 2023 मध्ये प्रकरण दाखल केले होते.