कृषी विभागातील गुणनियंत्रण विभागाचा महत्त्वाचा घटक असलेल्या बीज परीक्षण प्रयोगशाळा, खते नियंत्रण प्रयोगशाळा, कीटकनाशके तपासणी प्रयोगशाळा, कीटकनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा व मृदा तपासणी प्रयोगशाळांचे स्थलांतर नुकतेच झाले आहे. कृषी भवनच्या शेजारीच असणार्या व साखर संकुलला लागून असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात हे स्थलांतर होऊन पूर्ण क्षमतेने कामकाजास सुरुवात झाली आहे. तसेच, नमुनेही स्वीकारले जात असल्याचे सांगण्यात आले.
कृषी भवनच्या धोकादायक झालेल्या इमारतीमध्ये प्रयोगशाळा कार्यरत होत्या. आता नवीन कृषी संकुलचे कामकाज सुरू झाले असून, कृषी भवनची इमारत लवकरच पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या इमारतीच्या तळमजल्यावर कार्यरत असणार्या प्रयोगशाळांचे स्थलांतर गरजेचे झाले होते. कृषी भवनमधील बहुतांश कार्यालये खासगी जागेत यापूर्वीच स्थलांतरित करण्यात आलेली असून, कामकाजही सुरू झालेले आहे. सर्वच प्रयोगशाळांचे स्थलांतर पूर्ण झालेले असून, कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आलेले आहे. ही स्थलांतरण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील, पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
मात्र, प्रयोगशाळांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा खासगी जागेत उपलब्ध होत नसल्याने या प्रयोगशाळा शासनाच्याच जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला होता. त्यानुसार बीज परीक्षण प्रयोगशाळा व खत नियंत्रण प्रयोगशाळा या साखर संकुलजवळील जुन्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्याशेजारीच बराकीमध्ये कीटकनाशके तपासणी प्रयोगशाळा स्थलांतरित करण्यात आली आहे.
याव्यातरिक्त कीटकनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा ही शास्त्रीनगर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याकडील शासकीय वसाहत इमारतीत स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तसेच, मृदा चाचणी प्रयोगशाळा ही दापोडी येथे जलसंपदा विभागाकडील इमारतीत स्थलांतरित करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी, निविष्ठा उत्पादक, निविष्ठा वितरक आदींनी तपासणीसाठी नवीन पत्त्यावर निविष्ठा नमुने पाठवावेत, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.