पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान होणार आहेत. मंडळाच्या वतीने यंदा दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील श्रीमहादेवाचे भव्य शिवालय ही सजावट करण्यात येणार आहे. यामध्ये श्रीमहादेवाची भव्य पिंडी व त्यावर सतत जलाभिषेक हे सजावटीचे विशेष आकर्षण असणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
शिवालयात 16 हत्ती, 60 लहान मोठ्या आकाराच्या घंटा, 15 मोठे त्रिशुळ, मंडपाच्या मध्यभागी 10 फुटांचा नंदी, श्रीमहादेव व पार्वतीचे भव्य चित्र असेल. कला दिग्दर्शक विशाल ताजणेकर व त्यांचे सहकारी गजेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 60 कुशल कारागीर 1 महिन्यापासून शिवालय साकारण्याचे काम करीत आहेत. शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक, स्वराज्य, सामर्थ्य हे ढोल पथक असतील. श्रीशारदा गजाननाची प्रतिष्ठापना दुपारी 12 वा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
थोरात म्हणाले, ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित असते, त्याला मशिवालयफ असे म्हटले जाते. मंडळाच्या वतीने साकारण्यात येणार्या शिवालयात आल्यावर दगडामध्ये कोरलेल्या प्राचीन मंदिरात आल्याचा अनुभव भाविकांना होणार आहे. अतिशय बारकाईने कलाकारांनी सजावटीचे काम केले आहे. भव्य शंकराची पिंडी आणि त्यावरील जलाभिषेक विशेष आकर्षण ठरणार आहे.