मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन सात पोलिस ठाण्यांचा अखेर श्रीगणेशा होणार आहे. दहा दिवसांत या पोलिस ठाण्यांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. यासाठी नवीन 816 पोलिस अधिकारी, कर्मचारी मिळणार आहेत. तर पायाभूत सोई-सुविधांसाठी 59 कोटी 59 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. अंतिम प्रशासकीय मंजुरी या सर्व पोलिस ठाण्यांना मिळाली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्यामुळे नवीन पोलिस ठाण्यांचा प्रश्न आचारसंहितेपूर्वी मार्गी लागणार आहे.
आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलिस ठाणी सुरू होणार आहेत. पोलिस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, चतुःश्रृंगी, लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी आणि कोंढवा या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून तर पुणे ग्रामीणमधील हवेली या पोलिस ठाण्याचा काही भाग समाविष्ट करून या नवीन सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.
तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात पुणे शहर आयुक्तालयात नव्याने होणार्या 9 पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला होता. या पोलिस ठाण्यांची हद्द निश्चिती करून नकाशे तयार करण्यापासून जागेची पाहणी त्यांनी केली होती. पुढे पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता उपनगरांशी जोडलेली लोणीकंद आणि लोणी काळभोर ही पुणे ग्रामीण परिक्षेत्रातील दोन पोलिस ठाणी पुणे शहर आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या कार्यकाळात सुद्धा या पोलिस ठाण्यांबाबत शासनाकडे पाठपुरवा करण्यात आला, मात्र मुहूर्त काही मिळाला नाही. यानंतर अखेर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सतत पाठपुरावा करून या पोलिस ठाण्यांना अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळवून, नवीन मनुष्यबळाची तरतूद करून घेतली. नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमुळे सध्या असलेल्या परिमंडळांची रचना बदलणार आहे.
दिवसेंदिवस शहराचा वाढता विस्तार, अंदाजे पन्नास लाख लोकसंख्या या सर्व बाबी पाहता शहरातील सध्या असलेली 32 पोलिस ठाणी कामकाजाच्या दृष्टिकोनातून काही मर्यादा निर्माण होत होत्या. तर दुसरीकडे काही पोलिस ठाण्यांची मोठी हद्द, दाखल होणारी गुन्ह्यांची आकडेवारी पाहता त्या पोलिस ठाण्यांचे विभाजन करणे गरजेचे होते. या सर्व बाबी समोर ठेवून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा ठेवला. सुरुवातीला यातील तीन पोलिस ठाणी सुरू करा, असे शासनाकडून सांगण्यात आले. तसेच मनुष्यबळाबाबत देखील चर्चा झाली. अमितेश कुमार यांनी पन्नास टक्के मनुष्यबळाचा प्रस्ताव पाठवला होता. अखेर शासनाने त्याला मंजुरी दिली.
नवीन पोलिस ठाण्यांचा कारभार चालू करण्यासाठी आवश्यक असलेल्या इमारतींचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी त्या-त्या परिमंडळातली पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत. सोमवारी पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानुसार सायंकाळी पोलिस उपायुक्तांनी नवीन होणार्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या पोलिस चौक्यांना भेटी देऊन इमारत आणि जागेची पाहणी केली. तेथील जर एखादी चौकी मोठी आणि इमारत चांगली असेल तर तेथूनच पोलिस ठाण्यांचे कामकाज चालविण्यात येणार आहे. जर तसे शक्य नाही झाले तर एखादी इमारत तात्पुरत्या स्वरुपात भाड्याने देखील घेतली जाऊ शकते.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने 7 पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष कामकाजाला आठवडाभरात सुरुवात होणार आहे. यासाठी नवीन 816 पदांना मान्यता मिळाली असून, संबंधित पोलिस ठाण्यांच्या पायाभूत सोई-सुविधांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जागेची पाहणी करण्यात आली आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर