वर्षाला शेकडो मुले-मुली बेपत्ता होत असतानाच शहरातील विविध तीन पोलिस ठाण्यांत एकाच दिवशी तब्बल सात मुली बेपत्ता झाल्याचे गुन्हे दाखल झाले. त्यातील पाच मुलींचा शोध लावण्यात बिबवेवाडी आणि हडपसर पोलिसांना यश आले आहे. मात्र, एरंडवणे येथील बाल सुधारगृहातून पळालेल्या दोन मुलींचा अद्याप शोध लागला नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
प्रथमतः बिबवेवाडी पोलिसांनी मुलींचे नातेवाईक, शेजार्यांकडे त्यांचा शोध घेतला, तरीही त्या सापडल्या नाहीत. तिघींपैकी एकीकडेही मोबाईल नसल्याने त्यांच्या तपासात अडथळा निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील तसेच रेल्वेस्थानक, एसटी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचा माग काढला असता त्या तरुणी कल्याणला असल्याचे समजले. त्यातच बेपत्ता झालेल्या एका मुलीच्या बहिणीच्या फोनवर एका मुलीचा कॉल आला. तिने आपण कल्याण येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे आणि त्यांच्या पथकाने कल्याण येथील अंबिवली परिसरातील खडकपाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलींना ताब्यात घेण्यात आले. शहरात अल्पवयीन मुलींसंदर्भातील घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच हडपसर पोलिस ठाण्यात 12 वीत शिकणार्या दोन कॉलेज तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे मुलींचा तत्काळ शोध लागला. त्यामुळे मुलींच्या नातेवाइकांनी पोलिसांचे आभार मानले.